ठाणे : महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभिकरणाची कामे सुरु असतानाच, दुसरीकडे शहरातील काही रस्त्यांलगत राडारोड्याचे ढिगारे दिसून येत आहेत. ही बाब निदर्शनास येताच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी राडारोडा उचलण्यासाठी विशेष पथके तयार करून या पथकांमार्फत शहरातील राडारोडा उचलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हरित पट्टयामधील झाडांची लागवड घनदाट पध्दतीने करण्याच्या सुचनाही त्यांनी केली आहे.

ठाणे शहरात सुरू असलेली सौंदर्यीकरणाची कामे ही अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी घेतला. शहरातील पादचारी पूल, सेवा रस्त्यालगत असलेली उद्याने, उड्डाणपुलाखालील दोन गर्डरमधील मोकळ्या जागेत विद्युत रोषणाई अशी कामे शिल्लक आहेत. ही कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी पाहाणी दौऱ्यादरम्यान दिले. आनंदनगर येथील ठाण्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस दगडी दीपमाळा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम १५ एप्रिलपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आकर्षक रंगसंगतीने आनंदनगर येथील पदपथ तयार केले असून येथील संरक्षक खांबांना आकर्षक रंग देण्यात यावा. जेणेकरुन या परिसराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल, या दृष्टीने काम लवकरात लवकर करण्यात यावे असे आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची दुरावस्था; डॉक्टरांच्या गैरहजेरीसह कर्मचाऱ्यांची कमतरता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील रस्त्यांच्या कडेला ज्या-ज्या ठिकाणी राडारोडा नजरेस पडेल ते तातडीने उचलण्यात यावा. त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विशेष पथके तयार करण्यात यावी. या पथकाच्या माध्यमातून सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दोन पाळीमध्ये शहरभर गाड्या फिरत राहतील आणि त्यांच्यामार्फत राडारोडा उचलला जाईल याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. रस्त्याशेजारी विकसित करण्यात आलेल्या हरित पट्ट्यात लागवड केलेली झाडे ही आकर्षक व सुशोभित वाटत नाहीत. त्यामुळे हा पट्टा विकसित करताना विविध सुशोभित झाडांची दाट स्वरुपात लागवड करण्यात यावी. तसेच त्याची निगा व देखभाल उच्चप्रतीची ठेवण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.