कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अनागोंदीमुळे खेळाडूंचे नुकसान

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार वर्षांत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंची १ हजार ३४६ प्रमाणपत्रे अद्याप पालिकेत धूळ खात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेच्या क्रीडा स्पर्धांवर सुमारे १ कोटी ७५ लाखाचा खर्च करणाऱ्या महापालिकेला खेळाडूंच्या प्रमाणपत्रांचे भान कसे राहिले नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना स्पर्धा झाल्यानंतर पालिकेकडून विशेष कार्यक्रम आयोजित करून सन्मानाने प्रमाणपत्रे वितरित केली जातात. अनेक वर्षांचा हा शिरस्ता आहे. जिल्हास्तरीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खेळाडूंना आपला क्रीडाविषयक गुणांक वाढल्याचे समाधान मिळते. ही प्रमाणपत्रे खेळाडूंना शाळा, महाविद्यालय प्रवेश, नोकरीसाठी उपयुक्त ठरतात. मात्र, गेल्या चार वर्षांत १३४६ प्रमाणपत्रे वाटप न झाल्यामुळे अशीच पडून आहेत. आपल्या क्रीडाकौशल्याचे दाखले देणारे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक खेळाडू महापालिकेत जोडे झिजवताना दिसत आहेत. पण त्यांना तुम्हाला समारंभपूर्वक प्रमाणपत्र देण्यात येतील, अशी उत्तरे मागील पाच वर्ष क्रीडा विभागाकडून देण्यात आली, असे काही क्रीडा प्रशिक्षकांनी सांगितले.

क्रीडाविभागाचा खेळखंडोबा

  • मागील पाच वर्षांत क्रीडा विभागात एका महापौराच्या आशीर्वादाने अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्याला क्रीडा अधिकाऱ्याचा पदभार देण्यात आला होता. राजकीय आशीर्वाद असल्याने या अधिकाऱ्याने मागील पाच वर्षांत क्रीडाविषयक निधीचे ‘खेळमैदान’ करून त्याची वाट्टेल तशी उधळपट्टी केली. एका महिला महापौराने तर क्रीडा विभाग आपल्या महसुलाचे साधन असल्याचे मानले होते. खेळाडूंसाठी स्मृतिचिन्ह, हारतुऱ्यांवर लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले.
  • पालिकेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या क्रीडा शिक्षकांनाही अद्याप मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. काही शिक्षकांना हातखर्च म्हणून काही रक्कम देऊन त्यांची बोळवण केली आहे. स्पर्धेतील पंचांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. याविषयी क्रीडाशिक्षक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

प्रमाणपत्रे पडून

२०११       १३२

२०१३       २६१

२०१४       ४४४

२०१५       ५०९

क्रीडा विभागातील जुन्या सर्व दप्तरांची तपासणी करून त्यामधील अनियमिततेबाबत वेळोवेळी आयुक्तांना माहिती देण्यात आली आहे. क्रीडा विभागातील मागील कारभाराची सर्व दप्तरांची छाननी सुरू आहे.

राजेंद्र मुकणे, क्रीडा अधिकारी, कडोंमपा