क्रीडाप्रेमी नागरिकांची आयुक्तांकडे तक्रार
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील क्रीडाप्रेमी शिक्षक दिवंगत सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात रात्रीच्या वेळेत दारूच्या पाटर्य़ाना ऊत आल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. सकाळी या ठिकाणी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी यासंबंधी काही तक्रारी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. या बंदिस्त क्रीडागृहाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मतपेटय़ा वाहून नेणाऱ्या रिकाम्या पेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभागृहाचा क्रीडाप्रेमी नागरिकांना योग्य वापर करता येत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केल्या आहेत.
डोंबिवलीतील अनेक सामान्य नागरिक फिरण्यासाठी, बॅडमिंटन खेळण्यासाठी, दौड करण्यासाठी दररोज सावळाराम महाराज क्रीडासंकुलात येतात. शहरापासून जवळचे ठिकाण असल्याने नागरिक या ठिकाणाला पसंती देतात. तब्बल १९ एकर क्षेत्रफळाच्या क्रीडासंकुलातील मैदान नेहमी महापालिकेकडून महसूल कमविण्यासाठी विविध संस्थांना कार्यक्रम करण्यासाठी दिले जाते. या कार्यक्रमामुळे या मैदानात कचऱ्याचे ढीग दिसून येतात, अशा क्रीडाप्रेमींच्या तक्रारी आहेत. मैदान हे क्रीडाप्रेमींसाठीच राखीव ठेवा, अशी मागणी होत आहे.
टाकाऊ वस्तूंचे भांडार
वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात नेहमीच महापालिकेतील टाकाऊ वस्तू आणून ठेवल्या जातात. महापालिका निवडणुकीपूर्वी विशेष राखीव दलाचे जवान येथे राहत होते. दीड महिने त्यांचा या ठिकाणी मुक्काम होता. आता पालिका निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदान यंत्रांच्या रिकाम्या पेटय़ा सभागृहात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बॅडमिंटन खेळता येत नाही. रात्रीच्या वेळेत सभागृहात मोठय़ा प्रमाणावर मद्यपाटर्य़ा होतात तसेच सकाळी येणाऱ्या रहिवाशांना या बाटल्या उचलाव्या लागतात, अशी तक्रार संदीप चांदसकर, सुनील शहा, प्रकाश कुंदर, स. गि. सरदेसाई, किशोर बोलर, व्ही. एन. जीन्मया यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
पालिकेच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था
बंदिस्त क्रीडागृह सामाजिक, क्रीडाप्रेमी संस्थांना चालविण्यास दिले तर महापालिकेला महसूलाचा स्रोत सुरू होईल, असे या नागरिकांनी पालिकेला सुचविले आहे. क्रीडागृहातील विजेची व्यवस्था नादुरुस्त आहे. वीज वाहिन्या तुटल्या आहेत. काठी घेऊन पंखे, वीज सुरू करावी लागते. क्रीडाप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन या ठिकाणी विजेची व्यवस्था सुस्थितीत करून घेतली आहे. या ठिकाणचे स्वच्छतागृह स्वच्छ नसते. तेही क्रीडाप्रेमी नागरिक एकत्र येऊन स्वच्छ करतात. महापालिका प्रशासनाने बंदिस्त क्रीडागृह सामान्यांसाठी मोकळे राहील आणि रात्रीच्या वेळेत तेथील गैरप्रकार थांबिवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी क्रीडा प्रेमींकडून केली जात आहे. क्रीडासंकुलाच्या विकासासाठी सामान्य नागरिक मदतीचा हात पुढे करतील, असा विश्वास चांदसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.