राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा
देशभरातील आयुध निर्माण करणाऱ्या ४२ कंपन्यांची राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा आयुध निर्माण वसाहतीत पार पडली. या स्पर्धेत रुपेश पिल्ले हा कर्मचारी ‘ऑर्डनन्स श्री’चा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत सांघिक विजेतेपद पश्चिम विभागाला मिळाले आहे.
देशाच्या संरक्षण विभागासाठी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या देशभरातील आयुध निर्माण (ऑर्डनन्स) कारखान्यातील कामगारांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे अंबरनाथमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी ८०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. खुल्या गटात पश्चिम विभागातील रुपेश पिल्लेला विजेतेपद तर मध्य विभागाच्या बन्सिधर त्रिपाठी याने उपविजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेत पश्चिम विभागाच्या के. एस. राव (५५ किलो वजनी गट), पश्चिम विभागाचाच नीलेश कडलक (६० किलो वजनी गट), मध्य विभागाचे श्रीकांत बोरसरे (६५ किलो वजनी गट), पूर्व विभागाचे मिहिर नांदे (७० किलो वजनी गट), पश्चिम विभागाच्या जयदीप पवार (७५ किलो वजनी गट) यांची कामगिरी सरस ठरली.
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन अजिंक्य
बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजेते; ठाण्याच्या संघटनेचा पराभव
ठाणे : कुर्ला स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ६१व्या बाळकृष्ण बापट स्मृती ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनने उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याच्या ‘मांडवी मुस्लीम क्रिकेट क्लब’ला नमवून बापट ढालीवर आपले नाव कोरले. या वेळी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनला दहा हजारांचे पारितोषिक मिळाले तर ठाण्याच्या मांडवी मुस्लीम क्लबला सात हजारांच्या रोखीसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बापट ढालीसाठी झालेल्या अंतिम लढतीत ठाण्याच्या मांडवी मुस्लीम क्रिकेट क्लबने १६५ धावसंख्या उभारली होती. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या नवी मुंबई स्पोर्ट्सने ही धावसंख्या तीन गडी राखून सहजगत्या पार केली. या वेळी पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर म्हणाले की, मुंबईत अनेक जुने-जाणते खेळाडू प्रशिक्षण केंद्रांवर मार्गदर्शन करतात, पण बापट ढाल स्थानिक स्पर्धातून खेळणाऱ्या तरुणाईलाही मार्गदर्शन या खेळाडूंनी मार्गदर्शन करायला हवे. या वेळी मांडवी मुस्लीमचे नेतृत्व करणाऱ्या ५२ वर्षीय संगम लाड यांचे त्यांनी कौतुक केले.
राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत कल्याणच्या मुलींची पदकांची लयलूट
कल्याण : जम्परोप फाऊंडेशन ऑफ इंडिया व पॉण्डेचरी जम्परोप संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १२व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले असून या संघात कल्याणच्या तीन मुलींचा समावेश होता. यात श्रुती नायर, वनश्री जोशी, स्मृती नायर या तिघांनी पदके संपादित केली आहेत.
जम्परोप स्पर्धा या ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान पॉण्डेचेरी येथे पार पडलेल्या स्पर्धेत देशातून ५६० खेळाडू सहभागी झाले होते. या वेळी कल्याणच्या मुलींनी वैयक्तिक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. या श्रुती नायर हिला रौप्यपदक, वनश्री जोशी हिला २ रौप्यपदके, स्मृती नायरला १ रौप्य व १ कांस्यपदक मिळवता आले. तर बिर्ला महाविद्यालयाच्या अमन वर्माने १ सुवर्णपदक पटकावले.
या विजयी खेळाडूंना पॉण्डेचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी व क्रीडामंत्री आर. रामस्वामी यांच्या हस्ते गौरविण्यात आले, अशी माहिती अविनाश ओंबासे यांनी दिली.
आकांक्षा चतुरे राष्ट्रीय शालेय कबड्डी संघात
बदलापूर : बदलापूर गावातील आकांक्षा मोहन चतुरे या विद्यार्थिनीची २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांसाठी १४ वर्षे वयोगटांतील मुलींच्या राष्ट्रीय शालेय कबड्डी संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे आकांक्षा ही या संघात निवड झालेली मुंबई विभागातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या संघात संपूर्ण राज्यातून १३६ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. त्यात आकांक्षाचा ६वा क्रमांक होता. दरम्यान, २५ आणि २६ डिसेंबर २०१५ या दरम्यान पेंढरा विलासपूर, छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत तिने महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या खेळाची चमक दाखवून दिली असून याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
शालेय राष्ट्रीय एअररायफल स्पध्रेत ठाण्याच्या खेळाडूंना पदके
आर्यन देवलकरला रौप्य, तर रूद्राक्ष पाटीलला कांस्य
ठाणे : भारताच्या शालेय खेळ प्राधिकरणाच्या वतीने नुकत्याच इंदौर येथे पार पडलेल्या ६१व्या एअररायफल शूटिंग स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आठवीत शिकणाऱ्या आर्यन देवलकर याने रौप्यपदक पटकावले असून ठाण्यातीलच हिरानंदानी फाऊंडेशनच्या सहावीत शिकणाऱ्या रूद्राक्ष पाटील याने कांस्यपदक पटकावले आहे.
एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आर्यन देवलकर व रूद्राक्ष पाटील यांनी वैयक्तिक व सांघिकमध्येही चांगली कामगिरी केली आहे. यामुळेच त्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळाले आहे. ठाण्यातील कोपरी येथील द्रोणाचार्य स्पोर्ट्स अॅकॅडमीत गेल्या वर्षभरापासून या दोघांनी आपला सराव चालू ठेवला होता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या दोघांनी प्रथम ठाण्यात ऑक्टोबर महिन्यात झालेली जिल्हास्तरीय स्पर्धा व नोव्हेंबरमध्ये झालेली राज्यस्तरीय स्पर्धा यात नैपुण्य मिळवत या स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. त्यांच्या या विजयी कामगिरीमुळे ते राज्य व केंद्राच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धाचा समारोप
डोंबिवली : डोंबिवलीच्या प्रगती महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत विक्रोळीतील इंदिरा गांधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले आहे, तर राजीव गांधी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले आहे. यात यजमान प्रगती महाविद्यालय व अंबरनाथचे पी. डी. कारखानीस यांना तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुलदीप मेनकर, उत्कृष्ट चढाईपटू म्हणून अक्षय सोनी, उत्कृष्ट पकडपटू हितेश तावडे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. पा. महाजन समारोपावेळी उपस्थित होते.