ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर भागात नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. शहरात पाणी आणि कचऱ्याची समस्या आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील नव्या इमारतीच्या परवानग्या बंद करा अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच महापालिका ‘ओसी’ मध्ये पाण्याची जबाबदारी तुमची असे लिहून देते. महापालिका लोकांना थूकपट्टी लावण्याचे काम करत आहे असा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील सभागृहात ‘जन संवाद’ नावाने जनता दरबार घेतला. यावेळी ठाण्यातील विविध भागातून नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले होते. यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाणे शहरात पाणी, कचऱ्याचा प्रश्न आहे. ठाणे शहरात नाले सफाई ठप्प आहे. संपूर्ण घोडबंदर भागात पाणी नाही. तिथे टँकरने पाणी आणले जाते. ठाणे महापालिका क्षेत्रातील नव्या इमारतीच्या परवानग्या बंद करा असे आव्हाड म्हणाले. ठाण्यातील प्रत्येक तलावांमध्ये सांडपाणी सोडले जात आहे. महापालिकेकडे कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याचेही ते म्हणाले.
महापालिका ‘ओसी’मध्ये पाण्याची जबाबदारी तुमची असे लिहून देते. महापालिका लोकांना थूकपट्टी लावण्याचे काम करत आहे. दूरदृष्टी नसलेली माणसे जेव्हा सत्तेत येतात, तेव्हा काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाणे आहे. आम्ही ४५ वर्षांत पाणी स्त्रोत उपलब्ध करू शकलो नाही हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. जर दोन ते तीन हजार कोटीचा रस्ता आणू शकता तर तेवढ्याच किमतीचे धरण आणू का शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग म्हणजे खंडणी सेल, हप्ते घेण्याची सशक्त विभाग आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही ज्यात अतिक्रमण विभाग पैसे घेत नाही. ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचा विशेष सेल आहे. त्या विभागामध्ये नेमणूक करण्यासाठी पाच-पाच कोटी रुपये दिले जातात. हा विशेष सेल कशासाठी हवा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच क्लस्टरच्या नावाखाली पैसे कमविण्याचा उद्देश सुरू आहे. घोडबंदर येथील मानपाडा भागात १०० टक्क्यांपैकी ८० टक्के लोकांचा क्लस्टरला विरोध आहे. शासन चालविण्यासाठी पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी शासनाकडे पैसे नाही आणि हे लोकांना घरे कसे बांधून देणार असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.