बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर तसेच स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ हे श्वान मुक्तपणे फिरताना दिसतात. काही वेळा ते प्रवाशांच्या अगदी जवळ येतात, तर काही फलाटावरील आसनांवर बसून किंवा झोपून राहतात. यामुळे प्रवाशांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण होते. “कुठे चावतील का?” ही भीती मनात ठेवूनच प्रवास करावा लागतो, अशी प्रवाशांची भावना आहे.
रविवारी सकाळी घेतलेल्या छायाचित्रांत स्पष्टपणे दिसते की, स्थानक परिसरात दोन-तीन श्वान पावसाने ओले झालेल्या फरशीवर पडलेले किंवा इकडे तिकडे फिरत आहेत. प्रवासी गर्दीतून या श्वानांना चुकवत चालत असतात. काहीजण तर घाबरून थांबूनच जातात. यामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने भटके श्वान पकडून निर्बीजीकरण करण्याची मोहीम काही महिन्यांपूर्वी सुरू केली होती. मात्र सध्या ही प्रक्रिया थंडावली असल्याचे दिसते. परिणामी, शहरासोबतच स्थानक परिसरातही श्वानांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी होत आहे. “रेल्वे स्थानक हे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेले ठिकाण आहे. येथे भटक्या प्राण्यांचा वावर थांबवण्यासाठी आणि त्यांचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने संयुक्त मोहीम राबवावी,” अशी मागणी अजय थाटे या प्रवाशाने केली आहे.
प्रवाशांना निर्धास्तपणे आणि भीतीविना प्रवास करण्याचे वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भटके श्वान पकडणे, त्यांचे निर्बीजीकरण आणि पुनर्वसन याबाबत लवकरात लवकर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चौकट: शहरातही भय कायम
बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रस्ते, महत्त्वाचे, वर्दळीचे चौक, पदपथ अशा सर्व ठिकाणी भटक्या श्वानांचा वावर आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत वावरताना दिसतात. पहाटे आणि रात्री उशिरा या भटक्या श्वानांच्या टोळी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येतात. रात्री उशिरा घरी परतणारे नोकरदार, महिला या भीतीच्या छायेत प्रवास करतात. अनेकदा या टोळ्या वाहनांवर विशिष्ट दुचाकी वाहनांवर धावून जातात. त्यामुळे वाहन चालकांचा तोल बिघडण्याची भीती असते.
खाद्यासाठी कचरा उत्खनन
भटक्या श्वानांपासून अंतर ठेवण्यासाठी अनेक नागरिक त्यांना खाद्य देत नाहीत मात्र आपल्या खाद्यासाठी हे भटके श्वान रहिवासी संकुलाच्या आवारात, प्रवेशद्वारावर किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचराकुंडी उकरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळच्या वेळी अनेक कचऱ्याचे डबे, पिंप अत्यवस्त पडलेले दिसतात. त्यातून कचरा पसरल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिक भटक्या श्वानांपासून दुहेरी त्रासात आहेत.