अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील अनेक भागांत रात्रीच्या वेळेस पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या अंधारामुळे अपघात, चोरी, तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप अंबरनाथ शहर समितीने आता आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ११ ऑगस्ट रोजी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. सण उत्सवांचा काळ सुरू झाला असून पथदिवे बंद असल्याने नागरिकांत संताप आहे.
अंबरनाथ शहरात विविध रस्त्यांचे रूंदीकरण, कॉंक्रिटीकरण झाले. शहरातील बहुतांश रस्त्यांवर नवे पथदिवे बसवले आहेत. मात्र त्यांची निगा राखली जात नसल्याने अनेकदा ते बंद असतात. त्यामुळे नागरिकांना अंधारात प्रवास करावा लागतो. आता सण उत्सवांचा काळ सुरू झाला आहे. येत्या काही दिवसात गणरायाचे याच रस्त्यांवरून आगमन होणार आहे. मात्र अनेक भागातील पथदिवे बंद आहेत. हीच बाब भाजपच्या वतीने समोर आणण्यात आली आहे. याविरूद्ध आता भाजपने आक्रमक भूमिका घेऊन पथदिवे वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले-पाटील आणि अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजित करंजुले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही पथदिव्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे विश्वजीत करंजुले यांनी बोलताना सांगितले.
मोर्चा कधी
मोर्चा ११ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबरनाथ (पूर्व) येथून निघून थेट पालिका कार्यालयावर धडक देणार आहे. शहरातील अनेक भागांत अंधाराचे छायाचित्रे भाजप कार्यकर्त्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना सादर करत कारवाईची मागणी केली आहे. कॉंक्रिटचे रस्ते बनवताना पथदिव्यांचा विचारच न झाल्याने ही समस्या गंभीर झाली आहे.
पालिका वीज विभाग आणि बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव हे या समस्येचे मूळ कारण असल्याचा आरोप भाजपने केला आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या साटेलोट्यामुळे नागरी सुविधा दुर्लक्षित केल्या जात आहेत. दर्जेदार कामाऐवजी मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली जात आहेत, असा आरोप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले-पाटील यांनी केला. जर वेळेत उपाययोजना न केल्या गेल्या, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. सध्या अंबरनाथकर रात्रीच्या अंधारात सुरक्षिततेचा प्रश्न घेऊन त्रस्त आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.