ठाणे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. असे असताना ठाणे पूर्वेकडील भारत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आरोग्यविषयक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने पालक तसेच विद्यार्थी हैराण झाले आहेत. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजेश वायाळ पाटील यांनी बुधवारी शाळेतील मुख्याध्यापिकांची भेट घेऊन समस्यांवर जाब विचारत त्यांना निवेदन दिले. तसेच दिलेल्या मुदतीत सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देखिल देण्यात आला आहे.
ठाणे पुर्व येथे भारत इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच महाविद्यालय आहे. मागील अनेक महिन्यापासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेमध्ये सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना काही विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे. याशिवाय शाळेतील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे चित्र आहे. तसेच, स्वच्छतेचा अभाव आहे. पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी बादलीमध्ये साठवून ते पाणी वापरले जात आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीही शाळेत गैरसोय असल्याचे दृश्य आहे. तसेच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, यंदा शाळेची फी वाढवण्यात आली असतानाही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
यासंबंधी बुधवारी शिवसेनेचे राजेश वायाळ पाटील यांनी शाळेला भेट देत मुख्याध्यापिकांना या सर्व समस्यांबाबत जाब विचारला. त्यांना निवेदन देताना पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात घालणाऱ्या या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा. मुख्याध्यापिकांनी यावेळी आठवडाभरात या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनावर समाधान न मानता पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर आठवडाभरात मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊ.
काही दिवसांपुर्वी ठाण्यातील एका नामांकित शाळेत निर्माणाधीन वर्गात विद्यार्थ्यांना बसविल्याने डेंग्यू, मलेरियाची लागण झाल्याचा प्रकार उघडकिस आला होता. अशातच भारत विद्यलयातही अस्वच्छतेचा कारभार सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याबाबत शाळा प्रशासनाने लक्ष द्यावे असे बोलण्यात येत आहे.