उपकेंद्रात ना अभ्यासक्रमांची व्यवस्था, ना प्रवेश प्रक्रियेच्या माहितीची सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर ठाणे परिसराला लाभलेले मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र या पट्टय़ातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक माहितीसाठीचे आधारकेंद्र ठरण्याची शक्यता होती. परंतु,मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या ५६ हून अधिक पदवी अभ्यासक्रमांपैकी केवळ चार अभ्यासक्रम या उपकेंद्रात सुरू असून त्यासाठी प्रवेश प्रक्रियेची पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना मिळण्याची  ठोस सुविधा येथे उपलब्ध नाही.  विशेष म्हणजे, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कलिना येथेच धाव घ्यावी लागत आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये माराव्या लागणाऱ्या फेऱ्या टाळण्यासाठी ठाणे येथे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यात आले. परंतु, २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरू झालेल्या विद्यापीठ उपकेंद्रामध्ये अशी कोणतीच सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली नाही. यंदा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी ठाणे-भिवंडी मार्गावरील बाळकुम येथील विद्यापीठ उपकेंद्राला भेट देऊन तेथून होणाऱ्या अभ्यासक्रमांची चौकशी सुरू केली. या केंद्रात सुरू असलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये संबंधी तसेच इतर मदत देण्यास कर्मचाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या ५६ विभागांतील सुरू असलेल्या पदवी अभ्यासक्रमांपैकी केवळ ४ अभ्यासक्रमांचे शिक्षण इथे देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

या केंद्रामध्ये व्यवस्थापनविषयक बीएमएस आणि एमबीए हे अभ्यासक्रम सुरू आहेत, तर बीबीए आणि एलएलबी हे आणखी दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रम असल्याने हे केंद्र केवळ बारावी उत्तीर्णासाठीच उपयुक्त आहे. मात्र त्यांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती या केंद्राकडून मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना कलिना येथील संकुलाकडेच धाव घ्यावी लागत आहे.

मुंबई विद्यापीठातून दूरस्थ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कलिना विद्यापीठात जावे लागते. याशिवाय प्रवेश प्रक्रिया, पुनर्तपासणी, गुणांची फेरतपासणी, पदवी प्रमाणपत्रांमधील चुकांची दुरुस्ती, स्थलांतरण प्रमाणपत्र मिळवणे आणि अन्य कागदपत्रांच्या पूर्ततेसाठीही उपकेंद्राचा काहीच फायदा होत नाही, तर मुंबई विद्यापीठात वणवण करून पोहचल्यानंतरही तेथे काम पूर्ण होईल याची काहीच शाश्वती नसते.

-प्रथमेश यादव, विद्यार्थी 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students facing many problems in colleges in thane
First published on: 09-06-2016 at 01:59 IST