कल्याण : शैक्षणिक वर्ष जून मध्ये सुरू होऊन आता तीन महिने झाले तरी कल्याण डोंबिवली पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, दप्तरे व इतर शालेय साहित्याचे शिक्षण विभागाने वाटप न केल्याने पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पालिकेत नगरसेवकांची राजवट नसल्याने त्याचा गैरफायदा अधिकारी घेत आहेत, अशी टीका लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, इतर शालेय साहित्य देण्याचे शासनाचे आदेश आहेत. यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेतील अशीच पध्दत होती. गेल्या दोन वर्षापासून पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने त्याचा गैरफायदा अधिकारी घेत आहेत. अधिकाऱ्यांना या दिरंगाईचा जाब विचारणारे कोणी नसल्याने ते मनमानी करत आहेत, अशी टीका कल्याणचे भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.पालिका शाळेत येणारी बहुतांशी मुले झोपडपट्टी, चाळी, कष्टकरी घरातील असतात. त्यांना वेळेवर गणवेश, शालेय साहित्य दिले तर ही मुले नियमित शाळेत येतात. कष्टकरी वर्गातील अनेक पालक मुलांना गणवेश, शालेय पुस्तके, दप्तरे व इतर शालेय साहित्य खरेदी करू शकत नाहीत. अशा पालकांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिळणारे शालेय साहित्य मोठा आधार असतो. आता दोन महिने उलटले तरी पालिकेने विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, शालेय साहित्याचे वाटप केले नसल्याने माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी संताप व्यक्त केला. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पालिका शाळांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले नाही हे शिक्षकांनी सांगितले नाही का. या विषयीची माहिती आयुक्तांनी घेतली नाही का, असे प्रश्न जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उपस्थित केले. येत्या सात दिवसात पालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करावे, अशी मागणी कांबळे यांनी शिक्षण विभाग अधिकाऱ्यांना सोमवारी केली.

माजी नगरसेवकांची गांधीगिरी

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने अद्याप शालेय साहित्य वाटप केले नसल्याने संतप्त झालेले माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी पत्रीपूल येथील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पायी पालिकेचे सहजानंद चौक येथील शिक्षण मंडळाचे कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन शालेय साहित्य लवकर वाटप करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या गांधीगिरीने अधिकारी काही वेळ बावचळले.विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय साहित्य देणे हे प्रशासनाचे काम असताना त्याला विलंब का केला. या विलंबाला जबाबदार कोण, असे प्रश्न करुन जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी शिंदे यांनी केली.

शाळा संख्या

कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांची एकूण संख्या ७६ होती. इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा कल वाढल्याने पालिका शाळांवर परिणाम होऊन पालिकेच्या अनेक शाळा विद्यार्थी पटसंख्या नसल्याने बंद पडल्या. पालिका शाळांमध्ये यापूर्वी ३० ते ४० हजार विद्यार्थी होते. आता पालिकेच्या एकूण शाळांची संख्या ५९ आणि विद्यार्थी संख्या सुमारे आठ हजार आहे. इंग्रजी माध्यमाची दोन आणि दोन माध्यमिक शाळा आहेत.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते पूर्ण केले जाणार आहे.- विजय सरकटे, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग