ठाणे : नव्या बांधकाम प्रकल्पांचे केंद्र ठरत असलेल्या घोडबंदर भागात बिल्डरांच्या गृह प्रकल्पांना खेटून नाल्यांची उभारणी करणे तसेच प्रकल्पांना ‘ना हरकत’ दाखले देण्यासाठी मलनिस्सारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच चढाओढ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घोडबंदर परिसरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका उप अभियंत्याला डावलून अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि दुसऱ्याच परिसराचा कार्यभार असलेला एका उप अभियंत्याने वर्षभरात २१ बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
घोडबंदर विभागाची जबाबदारी ज्या उप-अभियंत्यांवर आहे त्याने यासंबंधीच्या तक्रारींचा पाढाच महापालिका शहर अभियंता विभागाकडे पत्राद्वारे वाचल्याने हा सावळागोंधळ उघड झाला असून ठाणे महापालिकेत यामुळे आणखी एक घोटाळा या लेटर बाॅम्बमुळे चव्हाटयावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची बांधणी करणे, विकास प्रस्तावांना ना हरकत तसेच पुर्णत्वाचा दाखला देणे अशी कामे मलनिस्सारण विभागामार्फत करण्यात येतात. या कामांसाठी ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय अभियंत्यांची नेमणुक केली आहे. त्यांच्याकडे बिल्डरांचे विकास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अटी व शर्तीची पुर्तता केली आहे की नाही, याची पाहाणी करूनच ना हरकत तसेच पुर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी असते. याशिवाय, या भागात पावसाळ्यात पाणी साचून पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नालेबांधणीची कामे करणे अशीही जबाबदारी असते. ही कामे करण्यासाठी घोडबंदर विभागासाठी एका उप-अभियंत्यांची यापुर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीच्या परवानग्या या अभियंत्यांच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यात दिल्या जाव्यात अशी कामकाजाची पद्धत आहे. असे असताना घोडबंदर भागातील बड्या बिल्डरांना परवानग्या तसेच ना हरकत दाखले देताना नियमांची पायमल्ली केली गेल्याची तक्रार या उप अभियंत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून पावसाळ्यात पुरस्थितीसारखे प्रकार यामुळे घडू शकतात, अशी भीती पत्राद्वारे उपस्थित केली आहे.
बिल्डरांच्या हितासाठी वाटेल ते …..
ठाणे महापालिकेच्या माजिवाडा- मानपाडा प्रभाग समितीमध्ये तक्रारदार उपअभियंत्याची नेमणुक आहे. या अभियंत्याने नगर अभियंत्यांना एक पत्र पाठवून आपल्या विभागातील दुसऱ्या उपअभियंत्याविरोधात तक्रार केली आहे. घोडबंदर भागात रस्ते आणि खाडीलगतच्या भागापर्यंत अनेक कच्चे नाले असून या भागात मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. यामुळे नाल्यांमध्ये बेकायदा भरणी करून नाल्याची रुंदी कमी करणे, नाल्याचे प्रवाह वळविणे असे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार रोखण्याठी नाल्यांची आरसीसी पद्धतीने बांधणी करण्यासाठी ७५ कोटींचा निधी उपलब्ध करून त्या कामांचे कार्यादेश यापुर्वीच देण्यात आले आहेत. हे कार्यादेश देताना नियमांची मोडतोड करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. याच भागात बिल्डरांकडून दाखल झालेल्या विकास प्रस्तावांना ना हरकत आणि पुर्णत्वाचे दाखले देताना महापालिकेची कार्यपद्धतीला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घोडबंदर भागात जो उपअभियंता कार्यरत आहे त्याने येथील सहा गृह प्रकल्पांना परवानगी दिली आहे. असे असताना मलनिस्सारण विभागात कार्यरत असणाऱ्या एक कार्यकारी अभियंता आणि या परिसराचा कार्यभार ज्या उप-अभियंत्याकडे नाही अशा दोघा अभियंत्यांनी २१ बिल्डरांच्या विकास प्रस्तावांना परस्पर ना हरकत दाखले दिल्याची तक्रार शहर अभियंता यांच्याकडे करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात नवा मलनिस्सारण घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वर्तकनगरचा उपअभियंता पण, लक्ष मात्र घोडबंदरकडे
अधिकार नसतानाही घोडबंदर भागात बिल्डरांच्या गृह प्रकल्पांना ना हरकत दाखला देणाऱ्या उप-अभियंत्याकडे गेली १२ ते १३ वर्ष वर्तकनगर, माजिवाडा-मानपाडा आणि ठाणे शहराचा कार्यभार पाहात असून सध्या त्याच्याकडे वर्तकनगरचा कार्यभार आहे. या उप अभियंत्याच्या कारभाराच्या अनेक तक्रारी या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. गेल्या १२ ते १२ वर्षात अटी व शर्तींची पुर्तता केलेली नसतानाही विकास प्रस्तावांना ना हरकत तसेच पुर्णत्वाचे दाखले दिल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या परवानगीबाबत उप अभियंत्याने नगर अभियंत्यांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर परवानगी देणाऱ्या उपअभियंत्याची चौकशी करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या तक्रारदारालाच आरोपांबाबत खुलासा देण्यास सांगितले आहे. दरम्यान, या संदर्भात ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.