ठाणे : वर्तकनगर, उपवन भागात एका खासगी कंपनीकडून रविवारी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले आहेत. रविवारी सकाळी ५ ते ११ यावेळेत वाहतुक बदल लागू असतील. ठाण्यातील एका खासगी कंपनीने रविवारी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या मॅरेथाॅन स्पर्धेत धावपटूंसह अनेकजण सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी किंवा अपघात होऊ नये यासाठी पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.
माजिवडा, खोपट येथून कॅडबरी जंक्शन मार्गे वर्तकनगरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कॅडबरी सिग्नलजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वर्तकनगरच्या दिशेने जाताना तीन वाहिन्यांपैकी एका वाहिनीद्वारे वाहतुक करतील.
कोरस, लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक या भागातील रहिवाशांना वर्तकनगर येथील सायकल थांबा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने लक्ष्मी पार्क, शास्त्रीनगर नाका चौकातून डावीकडे वळून आशावरी इमारतील जवळील मार्गावरून वाहतुक करतील. तर समतानगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना रेमंड कंपनी समोरील प्रवेशद्वाराजवळील समता नगर वळण रस्ता येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने समता नगर, रामचंद्र नगर, नितीन कंपनी जंक्शन येथून वाहतुक करतील. हे वाहतुक बदल रविवारी पहाटे ५ ते सकाळी ११ यावेळेत लागू असतील.