ठाणे – मागील अनेक महिन्यांपासून देशभरात भटक्या श्वानांचा मुद्दा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्वानांसंदर्भात नवे निर्देश दिले आहेत. न्यायलायाने दिलेले आदेश देशातील सर्व राज्यांना लागू असतील, असे न्यायालयाने नमूद केले आहे. यावरून रस्त्यावरील श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात ठाण्यातील प्राणी प्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्राणी प्रेमींकडून या आदेशाविरोधात शनिवार, २३ ऑगस्टला सकाळी १० . ३० वाजता ठाण्यातील उपवन तलाव ॲम्फीथिएटर येथे शांततामय आंदोलन केले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या आदेशांनुसार, राजधानी दिल्लीतून ताब्यात घेतलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांना लसीकरण आणि निबिजीकरण केल्यानंतर सोडण्यात येणार आहे. यामध्ये फक्त ज्या कुत्र्यांना रेबिजची लागण झाली आहे किंवा जे कुत्रे आक्रमक वर्तन करताना दिसत आहेत, अशा कुत्र्यांनाच फक्त त्यांच्यासाठीच्या निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे. एकीकडे प्राणीप्रेमी किंवा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांसाठी हा मुद्दा भावनिक झालेला असताना या श्वानांमुळे होणारी शारीरिक इजा सहन हे मुद्दे महत्त्वाचे ठरले आहे. रस्त्यावरील श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात ठाण्यातील सिटिझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप) फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या प्राणीप्रेमी संस्थांच्या पुढाकाराने शांततामय सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्या आदेशावर स्टे दिला असला तरी उचलण्यात आलेले श्वान परत मिळणार की नाही याबाबत प्राणीप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशभरातील नागरिकांनी या आदेशाचा विरोध सुरू केला असून, न्यायालयाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

सभेचे उद्दिष्ट

१) प्राण्यांविरुद्ध होणाऱ्या अमानुष कारवाईचा निषेध करणे

२) समाजात जनजागृती निर्माण करणे

३) लसीकरण, नसबंदी आणि जनजागृतीसारखे शाश्वत उपाय अंगीकारण्याची मागणी करणे

सभा कुठे आणि कधी होणार ?

दिनांक : शनिवार, २३ ऑगस्ट

वेळ : सकाळी १०.३० वाजता

स्थळ : ॲम्फीथिएटर, उपवन तलाव, ठाणे (प.)