हनुमान चालीसा आणि भोंगे यापेक्षाही मला महागाईचा मुद्दा महत्वाचा वाटतो आणि ही महागाई कशी कमी होईल, हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. माझा मतदार संघाबरोबरच राज्य आणि देशाचा कसा विकास होईल, याकडे लक्ष देत असून यामुळे इतर बाबींकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. तसेच खासदारांनाही खूप कामे असतात आणि ती माझ्या दृष्टीकोनातून महत्वाची आहेत, असे सांगत त्यांनी राणा दाम्पत्याचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक प्रकरणावरही भाष्य केलं. त्यांनी अशी प्रकरणे चव्हाट्यावर आणायची नसतात, असं या प्रकरणासंदर्भात मत व्यक्त करताना याचा मुलांवर परिणाम होतो असं सांगितलं.

ठाणे येथील टिपटाॅप प्लाझा सभागृहामध्ये शुक्रवारी राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महागाई प्रचंड वाढली असून त्याविरोधात आम्ही सातत्याने आंदोलने करतोय. शिवसेना आणि काँग्रेस या मित्र पक्षांकडूनही महागाईविरोधात आंदोलने केली जात आहेत. लोकसभेमध्येही महागाईचा मुद्दा लावून धरला होता. महागाई कशी कमी होईल हे आमच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे, असे सुळे यांनी सांगितले.

इंधनावरील कर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आधीच प्रत्येक राज्याला जीसएटीचे पैसे उशीराने मिळत आहेत, ते वेळेत मिळावेत ही अपेक्षा आहे. पैसे मिळत नसल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होतो, असेही ते म्हणाल्या. अनिल देशमुख आणि नवाब मलीक यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिस करीत आहेत. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असून त्यांच्या तपासातून सत्य बाहेर येईल. त्यामुळे या हल्ल्याबाबत तर्कविर्तक काढणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचे नेते गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, अशी प्रकरणे चव्हाट्यावर आणायची नसतात. ती आपआपसात मिटवायची असतात. कारण, त्याची मुले शाळेत जातात आणि समाजात वावरत असतात. अशा प्रकरणांमुळे ही मुले दुखावली जातात. अशा गोष्टींवर उघडपणे बोलणे योग्य नाही. कुणाला मदत करायची असेल तर ती न बोलताही करता येते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. भाजपाचे आशिष शेलार हे बुस्टर डोस देत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र ते दुसऱ्या कंपनीऐवजी केवळ सीरमचेच द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.