ठाणे– स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘‘स्वच्छता ही सेवा’’ अभियान राबविण्यात येत आहे. आजपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. तर, २ ऑक्टोबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. यावर्षीच्या या अभियानासाठी “स्वच्छोत्सव” ही थीम निश्चित करण्यात आली आहे.

या अभियानाचा शुभारंभ आज, तालुका व गावस्तरावर परिसर स्वच्छता उपक्रमांद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता लक्ष युनिट्स अंतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करून त्याठिकाणांची मॅपिंग व स्वच्छता केली जाणार आहे. तसेच, जास्त लोकसंख्या असलेल्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. सफाईमित्र सुरक्षा शिबिरांद्वारे सफाई मित्रांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सफाई मित्रांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिरे आणि तालुकास्तरीय डिग्निटी कॅम्प आयोजित केले जाणार आहेत.

या अभियानांतर्गत क्लीन ग्रीन उत्सव या उपक्रमाद्वारे पर्यावरणपूरक आणि शून्य कचरा उत्सव साजरा होणार आहे. तसेच प्रबोधनपर उपक्रमांमध्ये स्वच्छ सुजल गाव, कचऱ्यापासून कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट फूड, प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी यांसारख्या जनजागृतीपर कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. याशिवाय ‘‘एक दिवस, एक तास, एक साथ’’ या महास्वच्छता उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर २०२५ रोजी देशव्यापी श्रमदान होणार असून, सर्व गावस्तरीय घटकांचा यात सहभाग असेल. विशेष ग्रामसभेद्वारे गावांना हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गाव, स्वच्छ सुजल गाव आणि हर घर जल या उपक्रमांतर्गत घोषीत करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. ही विशेष ग्रामसभा २ ऑक्टोबरपर्यंत कधीही आयोजित करता येणार आहे.

स्वच्छता ही सेवा २०२५ या अभियानातील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या विशेष तयार केलेल्या आयटी पोर्टलवर http://www.swachhatahiseva.gov.in वर नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व उपक्रमांचे सतत निरीक्षण शासनस्तरावरून केले जाणार आहे. “ग्रामपंचायतींनी उत्साहाने व प्रभावीपणे या अभियानात सहभाग नोंदवावा आणि जिल्हा स्वच्छतेच्या दिशेने एक आदर्श घालून द्यावा,” असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक पंडीत राठोड यांनी केले आहे.