डोंबिवली : भारत विकास परिषद आणि शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान शाखेतर्फे आयोजित राष्ट्रीय समूह गायन स्पर्धेत डोंबिवलीतील १३ शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद दत्तनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या समूहगान स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हिंदी, संस्कृत भाषेतील देशभक्तीपर गीते सादर केली.
देशभक्तीपर गीतांना साजेसे पेहराव विद्यार्थ्यांनी केले होते. विद्यार्थ्यांमधील राष्ट्रभक्ती जागृत व्हावी. राष्ट्रभक्तीच्या जुन्या गाण्यांची रचना, त्याची मांडणी आणि त्यामधील विचार सर्वदूर पोहचावा हाही या उपक्रमा मागील उद्देश आहे. अनेक वर्षापासून भारत विकास परिषद, कॅ. विनयकुमार सच्चान शाखा हा उपक्रम आयोजित करते.
ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर शाळेने दुसरा क्रमांक आणि स्वामी विवेकानंद शाळेच्या अरूणोदय शाखेने तिसरा क्रमांक पटकावला. ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळा आणि ओंकार इंटरनॅशनल शाळा यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
पहिल्या तीन बक्षिसांमध्ये स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. सहभागी प्रत्येक शाळेने देशभक्तीपर गीतांचे उत्तम सादरीकरण केले. या कार्यक्रमाला गायिका अबोली ठोसर, भारत विकास परिषदेच्या शाखा अध्यक्षा ॲड. वृंदा कुलकर्णी, ॲड. शिल्पा भागवत, वासुदेव हेरवाडकर उपस्थित होते. भानुदास देशपांडे, निशाद पवार, प्राची कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. राष्ट्रीय समूहगान स्पर्धा प्रांत संयोजक मनीष कुलकर्णी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
या देशभक्तीपर गितांच्या समूहगान स्पर्धेत आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक यावा म्हणून प्रत्येक सहभागी शाळा मेहनत घेत होती. दैनंदिन अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा शाळा सुटल्यानंतर समूहगानाचा सराव घेतला जात होता. शाळेतील संगीत शिक्षक यामध्ये महत्वाची भूमिका बजावत होते. देशभक्तीपर गाण्याने त्याला साजेसा पेहराव असावा असे नियोजन प्रत्येक शाळेने केले होते.
इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी आणि संचालक मंडळाने या स्पर्धेत स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली म्हणून समाधान व्यक्त केले आहे. राष्ट्र विचार आत्मसात करणे आणि प्रचाराचे देशभक्ती समूहगान स्पर्धा हे प्रभावी माध्यम आहे. जात, प्रांत भेद विसरून विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात हेही बोध घेण्यासारखे आहे, असे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले.