सध्या जनतेमध्ये ईव्हीएमबाबत संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण प्रस्ताव मांडणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
“अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या आहेत. तो राज्यांचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात”, असे ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या संदर्भात पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
“कर्नाटकमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या असल्याचे समजत आहे. निवडणुका कशा घ्याव्यात, हा निर्णय राज्य सरकारचा असतो. एकीकडे ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होत असताना प्रयोग म्हणून का होईना, महाराष्ट्रातील निवडणूका मतपत्रिकेवर घ्याव्यात, असा माझा आग्रह आहे. माझी ही भूमिका मी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज्याच्या निवडणुका पाहता तो अधिकार राज्याचा असल्याने यावेळेस मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात बॅलेट पेपर इतिहासजमा
२०१९ मध्ये निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. त्यावेळी निवडणुक आयोगाने यापुढे मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर होणार नाही असे सांगितले होते. त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल असं स्पष्ट केले होते. यावेळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, मात्र त्या मशीनसोबत छेडछाड होणं शक्य नाही असंही सुनील अरोरा यांनी म्हटलं होते.