शहापूर : गणेशोत्सवापुर्वी शिक्षकांचा पगार खात्यावर जमा करावा, असे शासकीय आदेश असतानाही गणेशोत्सवाआधी तर नाहीच पण, पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतरही शिक्षकांचे पगार झाले नाहीत. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे निवृत्ती वेतन धारकांचे वेतनही अजूनपर्यंत मिळाले नसल्याने त्यांच्याही आनंदावर विरजण पडले आहे. वेतन केव्हा मिळेल, या प्रतिक्षेत शिक्षक आहेत.
२७ ऑगस्टला सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होण्यासाठी १ सप्टेंबरला होणारा पगार २६ ऑगस्ट, २०२५ ला करण्याबाबतचा शासननिर्णय २१ ऑगस्टला काढण्यात आला होता. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार २६ ऑगस्टला होण्यासाठी वेतन देयके संबंधित कोषागार कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र शहापुर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील जिल्हापरिषदेच्या एक हजार १३९ शिक्षकांचे पगार शासन निर्णयानुसार २६ ऑगस्टला झालेच नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून पुढच्या दोन दिवसात तरी पगार होतील अशी आशा बाळगून असलेल्या शिक्षकांचा पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतरही पगार झाला नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. शिक्षकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने आनंदावर विरजण घालीत अखेर गणेशोत्सव साजरा करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
आनंदावर विरजण
ऑगस्ट महिना अखेरीस गणेशोत्सव येत असल्याने कर्मचाऱ्यांना सण साजरा करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचा पगार खात्यावर जमा करावा असे शासकीय आदेश होते. यानंतरही गणेशोत्सवा आधी तर नाहीच पण, पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतरही शिक्षकांचे पगार झाले नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
या संदर्भातील शासन निर्णयानंतरही शहापुर पंचायत समितीच्या एक हजारहून अधिक जिल्हापरिषद शिक्षकांचे पगार न झाल्याने अखेर आर्थिक अडचणींचा सामना करीत गणेशोत्सव साजरा करावा लागला असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे निवृत्ती वेतन धारकांचे वेतनही अजूनपर्यंत मिळाले नसल्याने त्यांच्याही आनंदावर विरजण पडले आहे.
प्रशासन म्हणते..
याबाबत ठाणे जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्याशी संपर्क साधला असता, निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्ती वेतन तालुक्याला वितरित करण्यात आले असून शिक्षकांची पगार बिले संबंधित कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.