कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या उपयोजनमध्ये (ॲप) काही तांत्रिक अडथळे येत असल्याने पालिका हद्दीतील नागरिकांना मालमत्ता देयक ऑनलाईन भरणे, नागरी समस्यांच्या ऑनलाईन तक्रारी करताना अनेक अडथळे येत आहेत. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

कल्याण डोंबिवली पालिकेचे ‘केडीएमसी.काॅम’ उपयोजन उघडले की अनेक वेळा ते आपल्या परिघ क्षेत्रात नसल्याचे संदेश नागरिकांना येत आहेत. मोठ्या मुश्किलीने कल्याण डोंबिवली पालिकेचे उपयोजन सुरू झाले की नागरिक आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईन माध्यमातून आपले मालमत्ता देयक भरणा करण्याचा प्रयत्न करतात. मालमत्ता देयक भरणा करत असताना मालमत्ता क्रमांक आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नागरिक देयक रक्कम भरणा करण्यासाठी पालिका उपयोजनवर बँकेचे प्रवेशमार्ग (गेटवे) निवडतात. बँकेचे प्रवेशमार्ग निवडले की त्यावेळी उपयोजनकडून लालपट्टीवर एक नकारात्मक संदेश येतो आणि पुढे कोणतीही रक्कम भरण्याची प्रक्रिया होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

अनेक वेळा प्रयत्न करूनही रक्कम भरणा करण्याची तांत्रिक अडचण कायम असल्याचे मालमत्ता देयक भरणा करणाऱ्या ग्राहकांनी सांगितले. पालिकेने गेल्या महिन्यात ग्राहकांना मालमत्ता कराची देयके वाटप केली आहेत. ही देयके पूर्ण रकमेत ऑगस्टपूर्वी भरणा केली तर ग्राहकांना भरणा रकमेत सूट मिळते. ही सूट मिळण्यासाठी आणि वेळेत आपले देयक भरणा करावे म्हणून मालमत्ता देयक ऑनलाईन माध्यमातून भरण्याचा प्रयत्न ग्राहक करत आहेत. त्यांना पालिकेच्या उपयोजनकडून प्रतिसाद मिळत नाही.

अशाच पध्दतीने काही ग्राहक आपण राहत असलेल्या परिसरातील नागरी समस्यांच्या तक्रारी पालिकेच्या उपयोजनवर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या तक्रारीही ऑनलाईन माध्यमातून स्वीकारल्या जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पालिकेने आपल्या बहुतांशी सेवा ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या सेवांचा लाभ घेताना ग्राहकांना अनेक तांत्रिक समस्यांचा अडथळा येत आहे. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन पालिकेने आपले उपयोजन (ॲप) सुस्थितीत राहील याची वेळोवेळी काळजी घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

नागरिक कर भरणा करण्यासाठी उत्सुक असताना पालिकेकडून येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे नागरिक कर देयक भरणा करू शकत नाहीत. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांनी नागरिकांना चालू वर्षाचा, त्यानंतरच्या येणाऱ्या वर्षाचा मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे डोंबिवली निवासी पुण्यात तात्पुऱ्या स्वरुपात राहत असलेल्या व्यक्तिने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण डोंबिवली पालिकेची ऑनलाईन उपयोजन यंत्रणा सुस्थितीत आहे. सर्व्हअर डाऊन किंवा अन्य कोणत्याही तांत्रिक अडचणी नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे अडचणी येण्याची गरज नाही. तरीही आपण यासंदर्भातची चाचपण करतो. – प्रमोद कांबळे,सिस्टीम ॲनॅलिस्ट, कडोंमपा