लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस तापमानाने उच्चांक गाठल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यातील तापमानात किंचीत घट पहायला मिळाली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी गाठली. जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच शहरांमध्ये पारा चाळीशीपार गेला होता. त्यामुळे पुन्हा उन्हाच्या झळा जाणवत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ आणि अवकाळी पावसाचा तडाका एकाच वेळी बसल्याचे दिसून आले आहे. त्यात मुंबई आणि महानगर प्रदेशात तापमानात वाढ पहायला मिळते आहे. समुद्र किनाऱ्याजवळ तापमानात मोठी वाढ दिसत नसली तरी किनाऱ्यांपासून दूरच्या शहरांमध्ये तापमानात वाढ दिसून आली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये आठवड्याच्या सुरूवातीपासूनच तापमानात वाढ पाहायला मिळत होती.

हेही वाचा…. ठाण्यात संस्थांना नाले दत्तक देण्याची योजना राबवा; भाजपा आमदार संजय केळकर यांची मागणी

हेही वाचा…. कल्याण-डोंबिवलीत केंद्र चालकांकडून आधार यंत्र भाड्याने देण्याचे प्रकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस तापमान चाळीशीपार जात असल्याचे दिसून आले होते. मात्र गुरूवारी ढगाळ वातावरणामुळे तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसची घट नोंदवली गेली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये तापमानापासून थोडा दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा तापमानात वाढ दिसून आली. अरबी समुद्रातील उच्च दाबाचा पट्टा आणि उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सरासरी तापमान पुन्हा चाळीशीपार गेले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुरबाड तालुक्यात ४१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे या शहरांमध्ये पारा चाळीशीपार गेल्याचे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर आणि तापमान

ठाणे – ४०
डोंबिवली – ४०.२
कल्याण – ४०.३
बदलापूर – ४०.२
मुरबाड – ४१
कर्जत – ४२