ठाणे – ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ४८ व्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील सुमारे दहा उद्योजकांना उद्योग क्षेत्रात केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट व्यवस्थापन, रोजगार निर्मिती, स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील योगदान आणि निर्यातीद्वारे देशाला परकीय चलन मिळवून दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
या वार्षिक सभेत ए. एस. पी. असोसिएट्स, मेयर ऑर्गनिक्स प्रा. लि., मिलन लॅबोरेटरीज, प्रा. लि., आकृती फार्मास्युटिकल्स, प्रा. लि., प्रिसाईज इलेक्ट्रिकल्स, आर. के. कंट्रोल इन्स्ट्रुमेंट्स, प्रा. लि., काइझेन एंटरप्रायझेस या उद्योगसंस्थांना निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच मे. दास प्रेसिशन मशीन टूल्स प्रा. लि. यांना स्प्रिंग कॉयलिंग यंत्रणा विकसित केल्याबद्दल, एचआर उपकरणे प्रा. लि. यांना पर्यावरणपूरक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या आधारे सी. आय. फ्लेक्सो मुद्रण यंत्र विकसित करून निर्यात केल्याबद्दल, तर मायक्रो मास्टर लॅबोरेटरीज प्रा. लि. यांना संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
सभेवेळी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पारीख यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व्यवसाय सुलभता ही संकल्पना बळकट करण्यासाठी नियमांचा बोजा आणि शिथलीकरण वर भर देत असल्याचे सांगितले. त्यानुसार महसूल विभाग, माथाडी, एमआयडीसी, महावितरण, एमपीसीबी, औद्योगिक सुरक्षा संचालनालय, उद्योग विभाग यांनी सुरूवात केली आहे. त्याचबरोबर कामगार विमा योजनेतील “स्प्रि योजना” याबाबतही त्यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे लघुउद्योगांच्या अडचणी, शासकीय धोरणांबाबत सूचना आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे संस्थेचे महासचिव भावेश मारू यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष आशिष सिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले.