कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दीपक हाॅटेल परिसरात शनिवारी रात्री अकरा वाजता एका कुख्यात गुंडाने हातात धारदार कोयता घेऊन एका महिलेला पैशाची मागणी करून धमकावले. त्यानंतर परिसरातील पादचारी, दुकानदार यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांच्यात दहशत निर्माण केली. या गुंडा विरुध्द एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागातील गुजराती शाळा भागात राहत असलेल्या रियाना खाजा शेख (२६) यांनी खाजा गफुर शेख (२४) या गुंडा विरुध्द विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. खाजा गुजराती शाळेजवळील जेठा कम्पाऊंड भागात राहतो. खाजा पोलिसांच्या अभिलेखावरील खतरनाक गुंड आहे. तो विविध गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी आहे. खाजाने दहशत निर्माण करण्यासाठी ७५ सेंटीमीटर लांबीचा धारदार कोयदा वापरला आहे.
रियाना शेख यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की खाजा शेख हा आपल्याकडे शनिवारी रात्री अकरा वाजता पैशाची मागणी करू लागला. आपण पैशास नकार देताच त्याने हातामधील धारदार कोयता घेऊन तो आपणास मारण्याच्या उद्देशाने अंगावर धाऊन आला. आपण झटपट हालचाल करून स्वताचा बचाव केला. त्यानंंतर खाजा शेख या गुंडाने कल्याण पश्चिमेतील दीपक हाॅटेल भागात हातामधील कोयता हवेत फिरवत मोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घातला. हातामध्ये कोयता असल्याने कोणीही पादचारी त्याला रोखण्यासाठी पुढे जात नव्हता. खाजाच्या दहशतीने परिसरातील रिक्षा चालक अचानक तो आपल्यावर रागाच्या भरात हल्ला करून या विचाराने धास्तावले होते.
आपणास रोखण्यास कोणी पुढे आला तर आपण त्याला मारून टाकू, अशा आरोळ्या खाजा ठोकत होता. दीपक हाॅटेल परिसरातील एकही दुकानदाराने दुकान उघडता कामा नये, नाहीतर त्यांना बघून घेऊ, अशी धमकी खाजा शेख देत होता. रात्रीच्या वेळेत खाजा गुंडाने कल्याण रेल्वे स्थानक भागात अर्धा तास गोंधळ घातला होता. नागरिक त्याच्या हातामधील कोयता पाहून पळून जात होते.
खाजाच्या दहशतीबद्दल रियाना शेख यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी धारदार कोयत्याचा वापर करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, शस्त्र भंग कायदा, पोलीस उपायुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याबद्दल खाजा शेख विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हवालदार साळुंखे याप्रकरणाचा तपास करत आहेत.