डोंबिवली – डोंबिवलीतील पिसवली, आडिवली-ढोकळी, कल्याण पूर्व भागात राहुल पाटील या भाईच्या गुंडांची दहशत वाढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी मध्यरात्री राहुल भाईच्या आकाश भोईर आणि त्याच्या समर्थक गुंडांनी दोन पादचाऱ्यांना बेदम मारहाण केली. घटनास्थळी दाखल पोलिसांनी गुंडांंना शांत राहण्याचा सल्ला दिल्यावर गुंडांनी त्यांनाही धक्काबुक्की, शिवीगाळ करत गुंड पोलिसांदेखत पळून गेले.

या गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याने त्यांची मुजोरी वाढली असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पिसवली परिसरात राहणारे सचिन टाक, त्याचा मित्र मयूर खान शनिवारी मध्यरात्री उशिरा कामावरून घरी परतत होते. ते पिसवली भागातून पायी घरी चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला राहुलभाई पाटीलचा समर्थक गुंड आकाश भोईर सिगारेट ओढत होता. आकाशने सिगारेटचा झुरका घेऊन धूर रस्त्याने पायी चाललेल्या पादचारी सचिन टाक यांच्या तोंडावर सोडला. काही कारण नसताना माझ्या तोंडावर सिगारेटचा धूर का सोडला, असा प्रश्न सचिनने आरोपी आकाश भोईरला केला. आकाशने काहीही न बोलता सचिनला बेदम मारहाण सुरू केली. उलट आकाशने त्याचे दोन समर्थक घटनास्थळी बोलावून घेतले. तिघांनी मिळून सचिनला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारले. आम्ही राहुलभाई पाटील याची माणसे आहोत. आमच्या नादाला लागायचे नाही. येथे आवाजही करायचा नाही, अशी धमकी गुंड आकाशने सचिनला दिली.

हेही वाचा – ठाणे : छताचे प्लास्टर कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

सचिनने तात्काळ मानपाडा पोलिसांना मध्यरात्री संपर्क केला. हवालदार लखन म्हात्रे, पी. के. रामण्णा घटनास्थळी आले. सचिन टाकने आकाश भोईर आणि त्याच्या समर्थकांंनी आपणास काही कारण नसताना मारले असल्याचे सांगितले.

पोलिसांनी आकाशला शांत राहण्यास सांगून तेथून जाण्यास सांगितले. त्यावेळी आकाशने आम्हाला काही शिकवायचे नाही. समज द्यायची नाही. तुम्ही येथून गुपचूप निघून जायचे. असे बोलून आकाश हवालदार म्हात्रे, रामण्णाच्या अंगावर शिवीगाळ करत धावून आला. आपण राहुलभाई पाटीलची माणसे आहोत. आपल्या नादी लागायचे नाही. नाहीतर या भागात फिरू देणार नाही, अशी धमकी आकाश भोईरने पोलिसांना देऊन तेथून दुचाकीवरून पळ काढला.

हेही वाचा – कल्याणमध्ये मुलीच्या लग्नाला विरोध केल्यास आईला ठार मारण्याची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण, डोंबिवलीत गुंडांची दहशत वाढू लागली आहे. भुरट्या चोऱ्या, घरफोड्या, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. शहरात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.