ठाणे : ठाणे पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत ‘होऊ दे चर्चा’ या ठाकरे गटाच्या कार्यक्रमास केल्याने वाद रंगला असतानाच, शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम घेण्यास आक्षेप घेतल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचा प्रकार हजुरीत घडला. दोन्ही गटाकडून झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होताच पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या सुचनेनंतर ठाकरे गट तेथून निघून गेल्याने हा तणाव निवळला.
ठाणे शहरात ठिकठिकाणी ठाकरे गटाकडून ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चौक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने खोटी होती, त्याची पोल खोल करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण देत मनाई आदेश काढून ठाकरे गटाला चौक सभा घेण्यास मनाई केली होती. त्यांनतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात चौक सभा घेणारच असल्याचे जाहीर केले होते. यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध ठाणे पोलीस असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. असे असतानाच शनिवारी सायंकाळी ठाकरे गटाने हाजुरी भागात ‘ होऊ द्या चर्चा ‘ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
हा कार्यक्रम सुरू असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी आले. त्यांनी कार्यक्रमाला विरोध करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ठाकरे गटानेही घोषणाबाजी सुरू केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारानंतर वागळे इस्टेट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हाजुरीत कार्यक्रम घेऊ नये अशा सूचना ठाकरे गटाला दिल्या. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथून निघून गेल्याने हा तणाव निवळला. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही ठाकरे गटाला हा कार्यक्रम हाजुरीत करू नका अशा सूचना दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. परंतु पोलिसांनी हा वाद मिटविला. हाजुरीत आता शांतता आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल नाही. – अमरसिंग जाधव पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच.