डोंबिवली- डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील शिवाजी पुतळ्या लगतची मध्यवर्ती शिवसेना शाखेचा ताबा कोणाकडे यावरुन गेल्या महिन्यापासून धुसफूस सुरू होती. या शाखेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी ठाकरे गटाकडून बंडखोरी नंतर हटविण्यात आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटातील शिवसैनिकांनी सोमवारी दुपारी अचानक मध्यवर्ती शाखेत घुसून तेथील ठाकरे गटातील पुरुष, महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करत बाहेर काढले. आणि कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. शिंदे यांच्या तसबिरी लावल्या.

ठाकरे गटाने शिंदे गटातील शिवसैनिकांना शाखे बाहेर थोपविण्याचे प्रयत्न केले. परंतु एकावेळी शिंदे समर्थकांचा लोंढा शाखेत घुसला. त्यांनी शाखेतील ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना शाखे बाहेर जाण्यास सांगताच, त्याला ठाकरे गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर यांनी विरोध केला. राडा करण्याच्या इराद्याने शाखेत घुसलेल्या शिवसैनिकांनी खामकर यांना मारहाण करत शाखेच्या बाहेर नेले. त्यांचा शर्ट फाडला. खामकर यांच्या बचावासाठी धावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांवर हात उचलण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटातील शिवसैनिकांनी केला.

हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले. डोंबिवली पश्चिमेतील कोपर, कल्याण पूर्वेतील शिंदे समर्थक शिवसैनिक मोठ्या संख्येने शाखे समोर जमल्याचे चित्र होते. शाखेत कल्याण जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ, विधानसभा संघटक कविता गावंड इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दोन्ही गटात तुफान राडा होऊ शकतो याचा अंदाज घेऊन पोलिसांनी शाखा परिसरातील बंदोबस्त वाढविला आहे.

डोंबिवलीत सोमवारी शिंदे गटाकडून सभासद नोंदणीचा कार्यक्रम सर्वेश सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शाखेचा वाद उफाळून आल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटातून शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्र भरुन घेतली जात आहेत. त्याला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याने दोन्ही गटात जोरदार धुसफूस सुरू आहे.

शहरप्रमुखाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खा. श्रीकांत शिंदे समर्थक माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना शाखेत ताबा घेण्यासाठी घुसले. त्यांनी नियोजन करुन शाखेतील पदाधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. आपण बाहेर जात नाही म्हटल्यावर त्यांनी आपणास ओढत नेले. शर्ट फाडला. महिला पदाधिकाऱ्यांवर हात उचलले. ही शाखा माजी शहरप्रमुख दिवंगत गोविंद चौधरी यांच्या नावे आहे. त्यांची मुलगी विधानसभा संघटक कविता गावंड शाखेच्या नियोजनकर्त्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे, खा. शिंदे आणि रमेश म्हात्रे आले तरी शाखेचा ताबा सोडला जाणार नाही. कितीही दबाव आणला तरी आम्ही उध्दव ठाकरे यांचेच समर्थक म्हणून कार्यरत राहू, असे ठाकरे गटातील शहरप्रमुख विवेक खामकर यांनी सांगितले.