खड्डय़ांमुळे ठाकुर्लीतील रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार

डोंबिवली : डोंबिवलीजवळील ठाकुर्लीतील भोईरवाडी या नव्याने विकसित झालेल्या वसाहतीमधील रस्त्याची मुसळधार पावसाने चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डय़ांमुळे रहिवाशांना या भागातून चालणे मुश्कील झाले आहे. खड्डय़ांमुळे रिक्षाचालक या भागातील प्रवासी भाडे घेत नाहीत, अशी तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या.

ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्याजवळ भोईरवाडी आहे. डोंबिवलीतील जुन्या वसाहतींमध्ये राहत असलेली बहुतांशी मंडळी, मुंबई, कल्याण परिसरातील रहिवासी या भागातील नवीन संकुलांमध्ये राहतात. बहुतांशी वर्ग नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक गटातील आहे.

या संकुलांच्या बाहेर पालिकेचा विकास आराखडय़ातील रस्ता आहे. या रस्त्यावरून या भागात सुरू असलेल्या इमारत बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रक, कंटेनर, हायवा गाडय़ांची वाहतूक सुरू असते. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्यावर खडी टाकून पालिकेने रस्ते बुजविले होते. मुसळधार पाऊस, सततच्या वाहनांच्या वर्दळींमुळे या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे लवकर बुजवून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी रहिवासी पालिकेकडे ऑनलाइन, प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन करीत आहेत. आमच्या तक्रारींची कोणी दखल घेत नाही, असे रहिवाशांनी सांगितले.

भोईरवाडीतील रस्त्यावर अंबर स्टार, शंखेश्वर पार्क, शंखेश्वर व्हिला, अबोली इस्टेट, शंखेश्वर लेक व्ह्यू असे गृहप्रकल्प आहेत. या वसाहतीमधून दररोज दोन ते तीन हजार रहिवासी नोकरी, व्यवसायासाठी भोईरवाडी रस्त्यावरून ये-जा करतात. प्रत्येक संकुलाबाहेर सकाळ, दुपार, संध्याकाळच्या वेळेत प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षा उभ्या असायच्या, मात्र खड्डय़ांमुळे आता रिक्षाचालक या भागात येत नाहीत. सकाळच्या वेळेत लोकल वेळेत मिळावी म्हणून घराबाहेर पडल्यानंतर रिक्षा नसते. मुख्य रस्त्यावर जाऊन पायपीट करत जाऊन मग रिक्षाने प्रवास सुरू करावा लागतो, असे अलका पवार या महिलेने सांगितले. संध्याकाळी कामावरून परतल्यावर डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून भोईरवाडी रिक्षा पकडून घरी येण्याचा प्रयत्न केला तर अनेक रिक्षाचालक भाडे नाकारतात. भोईरवाडीत येण्याची एखाद्या रिक्षाचालकाने तयारी केली तरी तो गृहसंकुलासमोर न येता खड्डय़ांमुळे मुख्य रस्त्यावर उतरवतो, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

‘भोईरवाडीतील रस्ता खड्डय़ांमुळे खराब झाला आहे. या भागात प्रवासी वाहतूक केली तर खड्डय़ांमुळे रिक्षा सतत आपटून त्याचा एखादा भाग खराब होतो. दुरुस्तीचा दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येतो. दिवसातून प्रवासी भाडय़ातून एक ते दीड हजार रुपये मिळाले तर ते दुरुस्तीच्या कामासाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे भोईरवाडीत जाताना खड्डय़ांचा धोका असल्याने कोणी रिक्षाचालक या भागात येण्यास तयार होत नाही,’ असे पंकज पाटील या रिक्षाचालकाने सांगितले.

मानवी साखळी करणार

खड्डय़ांमुळे भोईरवाडी भागातील रहिवाशांना होणारा त्रास विचारात घेऊन या प्रश्नाकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. येत्या रविवारी या परिसरातील रहिवाशांनी मानवी साखळी भोईरवाडी रस्त्याच्या चारही बाजूंनी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून ही मानवी साखळी केली जाईल. या विषयाची माहिती पालिका अधिकाऱ्यांना देण्यात येईल. जेणेकरून भोईरवाडी रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे अधिकारी झटपट करतील, असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला.

पावसाळ्यापूर्वी बहुतांशी रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाऊस सतत सुरू असल्याने डांबरीकरणाचे काम करता येत नाही. असे रस्ते खडी टाकून बुजविले जातात. भोईरवाडी रस्त्याची माहिती घेऊन तेथे तातडीने खडी टाकून खड्डे बुजविण्याची कामे केली जातील. पाऊस थांबला की त्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. – व्ही. एस. पाटील, कार्यकारी अभियंता