डोंबिवली – गेल्या आठवड्यात ठाकुर्ली चोळेगाव हनुमान मंदिरा समोरील रस्त्यावर एक अवजड ट्रक बंद पडल्याने हा परिसर तीन तास वाहतूक कोंडीत अडकला होता. यामुळे प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला होता. त्याचीच मंगळवारी पुरावृत्ती झाली. मंगळवारी दुपारी एक ट्रक चोळे हनुमान मंदिरासमोर अचानक बंद पडला. त्यामुळे चोळे गाव परिसर पुन्हा मंगळवारी वाहतूक कोंडीत अडकला.
ठाकुर्ली चोळे गावातील रस्ता मोटारी, रिक्षा, दुचाकी अशा हलक्या वाहनांसाठी आहे. या रस्त्याची रुंदी दहा फूट आहे. हे माहिती असुनही काही ट्रक चालक मधला मार्ग म्हणून ठाकुर्ली चोळेगावातून कल्याण किंंवा डोंबिवलीला जाण्याचा प्रयत्न करतात. चोळे गावातील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्या घरा समोरील वळणावर अनेक वेळा तांत्रिक बिघाड होऊन किंवा ट्रकच्या टपाच्या उंचीमुळे ट्रक पुढे जाऊ शकत नसला की या भागात वाहतूक कोंडी होते.
मंगळवारी दुपारी एक ट्रक कल्याणहून ठाकुर्ली चोळे गावातील अरूंद रस्त्यावरून डोंबिवलीत येत होता. या ट्रक चालकाला बंदिश हाॅटेल, घरडा सर्कल येथून डोंबिवलीत येण्यास प्रशस्त रस्ता होता. पण हा ट्रक चालक दुपारी वाहतूक कमी आहे हा विचार करून ठाकुर्ली चोळे गावातून ट्रक घेऊन आला. हनुमान मंदिरासमोरील वळणावर ट्रक वळण घेत होता. त्यावेळी ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाला.
चालकाने अथक प्रयत्न करूनही ट्रक सुरू झाला नाही. अखेर या ट्रकच्या मागे असलेली वाहने आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक, डोंबिवली शहराच्या विविध भागातून येणारी, कल्याणकडून डोंबिवलीत, एमआयडीसीतून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहने जागोजागी अडकून पडली. दुपारची वेळ असल्याने वाहतूक पोलीस घटनास्थळी नव्हते. पाऊण तासानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर ट्रक बाजुला घेऊन या ट्रकच्या बाजुने वाहने सोडण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली.
ठाकुर्ली चोळे गावातील अरूंद रस्त्यावरून दररोज अवजड ट्रक, वाहने धावत असल्याने स्थानिक रहिवासी संतप्त आहेत. असे प्रकार दररोज होऊ लागले तर एक दिवस आम्ही या मार्गावरून अवजड ट्रक वाहतूक नको या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
ठाकुर्ली चोळे गावातील रस्ता अरूंद आहे. हलक्या वाहनांसाठी हा रस्ता योग्य आहे. हे माहिती असुनही अवजड ट्रक चालक या रस्त्यावरून वाहने आणतात. ही वाहने बंद पडली की हा रस्ता पूर्ण बंद पडतो. त्याचा त्रास प्रवासी, विद्यार्थी, स्थानिक रहिवाशांना होतो. वाहतूक पोलिसांनी ठाकुर्ली चोळेतील रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्याची अधिसूचना काढावी. – प्रभाकर चौधरी, माजी नगरसेवक