ठाणे : भिवंडी येथील गणेशपुरी भागात एका ६५ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी रविंद्र गवते (४०) याला अटक केली. महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात हत्या आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.पिडीत महिला गणेशपुरी भागात वास्तव्यास होती.

मंगळवारी तिचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत गावातील शेतामध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या मृत्यूची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण चोरीचे नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तपास करुन रविंद्र गवते याला अटक केली आहे. रविंद्र गवते हा पालघरमधील रहिवासी असून तो गणेशपुरी येथे शेतमजूर म्हणून आला होता. महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केल्यानंतर याप्रकरणी लैंगिक अत्याचाराचे देखील कलम लागू झाले आहे. रविंद्र याने महिलेची हत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.