बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरण गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे. मात्र काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तात्पुरता दिलासा देत फलाट क्रमांक १ वरील मध्यभागी नवीन स्वयंचलीत जिना (एस्कलेटर) कार्यान्वित केला आहे. यापूर्वी फलाट क्रमांक दोनवरील जिना जुना असल्याने मोठा वादंग झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून फलाट क्रमांक एकवर जिना लावण्याची मागणी होती. मात्र फलाट क्रमांक तीनवर जिना लावण्यात आला होता. या नव्या सुविधेमुळे फलाट क्रमांक १ वरून २ व ३ वर जाणे प्रवाशांसाठी अधिक सोयीचे झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि जड साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सोय विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी प्रवाशांना हव्या तशा सुविधा वेळेत देण्यात रेल्वे प्रशासनाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे येथे प्रवाशांमध्ये संताप आहे. दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. त्या तुलनेत लोकलची संख्या, जागा आणि गर्दीचा प्रश्नही गंभीर होतो आहे. सध्या रेल्वे स्थानकावर डेक बांधनीचे काम सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार स्वयंचलीत जिने सुरू केले जात आहेत. फलाट क्रमांक एकवर जिना सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवासी आता फलाट क्रमांक २ वर देखील अशीच सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र स्थानकाचे इतर बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी कामाचा वेग वाढवण्याची मागणीही कायम आहे.
स्थानकात लावणार ८ जिने बदलापूर रेल्वे स्थानकात एकूण आठ स्वयंचलित जिने बसवले जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यातील सहा स्वयंचलित जिने हे नविन असतील. तर २ जिने हे जुने पण आयुर्मान असलेले असतील. बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर बसवण्यात आलेला एक जिना हा जुना असल्याने त्यावरून वादंग झाला होता. त्यावर रेल्वे प्रशासनाला खुलासा करावा लागला होता. हा जिना उल्हासनगर स्थानकात २०१६ वर्षात बसवण्यात आला होता. तिथे कल्याण बदलापूर तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या कामामुळे हा जिना काढावा लागला होता. मात्र त्याचे २१ वर्षांचे आर्युमान अजुनही असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. तर त्या जिन्याची तांत्रिक तपासणी करूनच त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले होते.