या जमिनीच्या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेला खारेगाव ते गायमुख या खाडीकिनारी मार्गात बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या बदल्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील वळवण गावात पर्यायी जमीन देण्याच्या हालचाली ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरु आहेत. या जागेचे तलाठी, तहसीलदार आणि वनविभागाने एकत्रित सर्वेक्षण सुरु केल्यामुळे लवकरच या पर्यायी जमीनीच्या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता पालिका सुत्रांनी वर्तविली असून यामुळे ठाणे खाडी मार्गातील अडथळे लवकरच दूर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
हेही वाचा : गुटका खाण्यास नकार आणि चक्क रहिवाशावर चाकूने वार; डोंबिवली त्रिमूर्तीनगर मधील घटना
घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. तसेच घोडबंदरवासियांच्या वाहतूकीसाठी हा एकमेव रस्ता आहे. यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात कोंडी होते. या कोंडीमुळे घोडबंदरवासिय हैराण झाले आहेत. घोडबंदरवासियांची कोंडीतून सुटका करण्यासाठी ठाणे महापालिकेने खारेगाव ते गायमुख या खाडीकिनारी मार्गाचा प्रस्ताव तयार केला. विविध कारणांमुळे हा प्रस्ताव अद्याप प्रत्यक्षात उतरु शकलेला नाही. हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी पालिकेचे गेल्या वर्षांपासून प्रयत्न सुरु असून त्याचाच एक भाग या प्रकल्पाचा आराखडा तयार करून पालिकेने तो एमएमआरडीएकडे पाठविला होता. या प्रकल्पात कमीत कमी कांदळवन क्षेत्र बाधित होईल, याचा विचार करून पालिकेने हा आराखडा तयार केला होता. त्यापाठोपाठ या प्रकल्पात बाधित होणारी जमीन संपादित करण्याचे काम पालिकेने सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून खाडीकिनारी मार्गात बाधीत होणाऱ्या कांदळवनाच्या बदल्यात गडचिरोली येथे पर्यायी जमीन देण्याचा प्रस्ताव महापालिकेने वनविभागाला दिला होता. परंतु या जमिनीवरील जंगल नौसर्गिकरित्या खराब असल्याचे सांगत वनविभागाने ही जमीन नाकारली होती. यामुळे खाडीकिनारी मार्गात पुन्हा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र होते. ही जमीन नाकारल्यानंतर महापालिकेेने आता सातारा, बीड, उस्मानाबादमधील जमिनीचा पर्याय दिला होता. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील वळवण गावात जागेची पाहाणी करण्यात आली असून याठिकाणी तलाठी, तहसीलदार आणि वनविभागाने एकत्रित सर्वेक्षण सुरु केले आहे. येत्या एक ते दोन आठवड्यात हे सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल वनविभाग पालिकेला पाठविणार आहे. ही पर्यायी जमीन देण्याच्या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. तसेच वनविभागाचे कुर्ला येथील विभागीय वन अधिकारी आर्दश रेड्डी यांनीही गेल्या आठवड्यात खाडीकिनारी मार्गाची पाहाणी केली असून त्यांनीही या मार्गात कमीत कमी कांदळवन क्षेत्र बाधित होत असल्याची खात्री केल्याचे सुत्रांनी सांगितले.
या मार्गातील कांदळवन क्षेत्र बाधीत होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनोत्तर क्षेत्र वनविभागाला हस्तांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील वळवण गावात पर्यायी जमीन देण्याचा विचार सुरु केला आहे. १५ हेक्टर इतकी जमीन जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितील असून त्यासाठी ठाणे महापालिकेने सातारा जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केल्याचे सुत्रांनी सांगितले. या जमिनीचे पैसे ठाणे महापालिका सातारा जिल्हा प्रशासनाला देणार असून याशिवाय. त्याठिकाणी जंगल तयार करण्यासाठी येणारा खर्चही पालिका करणार आहे, असेही सुत्रांनी सांगितले.
घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खारेगाव ते गायमुख चौपाटी असा खाडीकिनारा मार्ग उभारण्यात येत आहे. १३ किलोमीटरच्या मार्गासाठी ६ लाख १० हजार ६८९ चौरस मीटर जागा लागणार आहे. त्यापैकी २.७२ किलोमीटरच्या मार्गासाठी लागणारी १ लाख २३ हजार ५८७ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित १०.७१ किलोमीटरच्या मार्गासाठी ४ लाख ८७ हजार ४०२ चौरस मीटर जागेचे पालिकेला भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामध्ये ३ लाख ८२ हजार ०८४ २.७२ चौरस मीटर जागा शासकीय, ९५ हजार ५१८ चौरस मीटर जागा खासगी आणि ८६ हजार २६३ चौरस मीटर जागा वन विभागाची आहे.