ठाणे : भिवंडी येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अंजुरफाटा ते अंजुर चौक ही मार्गिका सर्व वाहनांसाठी मध्यरात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असून पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे वाहतुक बदल ४ जून पर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत कायम असतील.
ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या भिवंडीत सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून भिवंडी येथील अंजुरफाटा ते अंजुर चौक भागात एमएमआरडीएकडून गर्डर उभारले जात आहेत. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले. नवी मुंबई, मुंबई येथून माणकोली मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गॅमन जंक्शन आणि माजिवडा वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी, घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करतील. नवी मुंबई, मुंबई येथून बाळकुम, अंजुरफाटा मार्गे गुजरात, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने माजिवडा जंक्शन मार्गे भिवंडीत जातील.
गुजरात येथून चिंचोटी नाका, अंजुरफाटा मार्गे नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने फाऊंटन, घोडबंदर, माजिवडा मार्गे वाहतुक करतील. अंजुरफाटा मार्गे मुंबई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कल्याण नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कल्याण नाका मार्गे अशोक नगर, भादवड नाका, रांजनोली, कोनगाव मार्गे वाहतुक करतील. नाशिक येथून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना वडपे नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वडपे नाका, भिवंडी, वाडा मार्गे जातील. हे वाहतुक बदल ४ जून पर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे पाच यावेळेत लागू असतील.