ठाणे : भिवंडी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माण कामांदरम्यान ठेकेदारांचा आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे एका रिक्षा प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी राॅड शिरुन तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोनू अली रमजान अली शेख (२२) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी धामणकर नाका येथून विठ्ठल नगरच्या दिशेने रिक्षातून प्रवास करत होता. भिवंडी येथे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी लागणारा लोखंडी राॅड रिक्षात बसलेल्या सोनू अली याच्या डोक्यात शिरला. या घटनेनंतर सोनू याला स्थानिकांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोनूवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. त्याच्या डोक्यात दोन ते तीन इंच राॅड आत गेल्याचेही डाॅक्टर म्हणाले. त्याच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया देखील पार पडली.

एमएमआरडीएने या घटनेनंतर स्पष्टीकरण दिले आहे. घटनेची माहिती मिळताच, दोन्ही कंत्राटदार कंपन्यांचे अधिकारी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रुग्णालयात दाखल झाले. मेसर्स अफकॉन्सना सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आणि जखमी तरुणाला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. जबाबदार असलेल्या मेसर्स अफकॉन्स कंपनीच्या कंत्राटदारावर ५० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर, मेसर्स सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा (इंडिया) कंपनीला पर्यवेक्षी त्रुटींसाठी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचेही एमएमआरडीए विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

  • या घटनेनंतर सोनू शेख याच्यासोबतच्या प्रवाशाने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५ अ, ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सोनूवर शस्त्रक्रिया झाली असून तो शुद्धीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • अपघातांची मालिका
  • घोडबंदर येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात मेट्रो मार्गिकेच्या कामा दरम्यान ३० जुलैला मोटारीवर राॅड पडला होता. या घटनेत वाहन चालक थोडक्यात बचावला. याच भागात २ मे या दिवशी देखील असाच प्रकार उघड झाला होता. एका मोटारीवर क्रेनचा भाग कोसळला होता. त्यामुळे निष्काळजीची मालिका सुरु असल्याचे चित्र आहे.