ठाणे : दिवाळी हा प्रकाश, समृद्धी आणि शुभारंभाचा सण मानला जातो. या सणामध्ये व्यापारी वर्गात विशेष महत्त्व असणारा दिवस म्हणजे लेखा पूजन. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे व्यापारी नवीन हिशोबपुस्तकाची पूजा करत असतात. मात्र, यंदा तंत्रज्ञानाच्या युगात या पूजेला आधुनिकतेची नवी जोड मिळाली आहे. ठाणे शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी यंदा लेखा पूजन पारंपरिक वह्या (चोपडी) ऐवजी संगणक, लॅपटॉप आणि मोबाईलवरील अकाऊंटिंग सॉफ्टवेअरवर केले आहे. त्यामुळे पारंपारिक उत्सवाला आधुनिकतेची जोड पहायला मिळत आहे.

लेखा पूजन हा दिवाळी सणाचा एक महत्वाचा आणि पारंपारिक धार्मिक व व्यावसायिक विधी आहे. लेखा पूजन म्हणजे दिवाळीच्या दिवशी व्यापारी वर्ग नवीन वर्षाच्या हिशोबपुस्तकाची पूजा करतात. प्राचीन काळापासून दिवाळीच्या दिवशी जुन्या वर्षाचा हिशोब संपवून नवीन वर्षाच्या हिशोबाची सुरूवात नवीन पुस्तकांमध्ये करण्याची परंपरा आहे. नवीन पुस्तकांवर आणि व्यापारी कार्यांवर लक्ष्मी आणि गणपतीची कृपा व्हावी म्हणून हे पूजन केले जाते. या पूजेमध्ये नवीन खातेवही किंवा डायरीची हळद, कुंकू आणि स्वस्तिक काढत पूजा केली जाते.

अनेकदा यासोबत गणपती आणि लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. असे केल्याने वर्षभर धन, सौभाग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. मात्र, आजच्या डिजिटल युगात व्यापाऱ्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पद्धतीने चालतो. टॅली, क्विकबुक्स यांसारख्या अकाऊंटिंग सॉफ्टवेअरवर हिशोब ठेवला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या उपकरणांचे हळद-कुंकू, फुले आणि अगरबत्तीने पूजन केले. काही जणांनी तर संगणकाच्या स्क्रीनवर डिजिटल स्वस्तिकाचे चिन्ह रेखाटून आरती सुद्धा केली. अनेक व्यापाऱ्यांनी मोबाईल अॅप्सवरील यूपीआय, पे-टीएम, फोनपे, गुगल पे यांसारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मचेही पूजन केले. कारण याच माध्यमांद्वारे रोजचे व्यवहार पूर्ण होतात.

लेखा पूजन कधी केले जाते

लेखा पूजन हे दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा अमावस्येच्या सायंकाळी केले जाते.

पूजनाची पारंपारिक पद्धत

पूजनापूर्वी दुकान, कार्यालय किंवा घरातील लेखा ठेवण्याची जागा स्वच्छ केली जाते. त्यानंतर नवीन हिशोबाच्या वहीचे पूजन केले जाते. आजच्या काळात अनेकजण लॅपटॉप, संगणक किंवा टॅबलेटवरही पूजन करतात. तसेच सुरुवातीला गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून नवीन वह्या उघडल्या जातात. नवीन वह्यांवर “श्री”, “ॐ”, “स्वस्तिक”, “शुभ-लाभ” अशी चिन्हे काढली जातात. नवीन खाते पुस्तकात पहिले लेखन म्हणून “श्री गणेशाय नमः” लिहिले जाते.

प्रतिक्रिया

पूर्वी आम्ही वह्यांमध्ये हिशोब लिहायचो, पण आता सर्व व्यवहार ऑनलाईन आणि यूपीआयद्वारे होतात. त्यामुळे हिशोब सॉफ्टवेअरवरच राहतो. त्यामुळे आता लॅपटॉपचे पूजन करतो. हेच आमचे आधुनिक हिशोबपुस्तक आहे.अरविंद जैन, सनदी लेखापाल