ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महामार्गांचे जाळे आहे. या जिल्ह्यातील महामार्गांवर अनेक ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे महामार्ग पोलिसांनी या दोन जिल्ह्यांतील महामार्गांवर वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये १३ कोटी ७४ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. .
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आहे. या दोन्ही जिल्ह्यात गोदामांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे उरण जेएनपीटीहून भिवंडी, गुजरात आणि नाशिकच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतुक होते. तसेच हलक्या वाहनांची वाहतुक देखील येथून मोठ्याप्रमाणात होत असते. बेदरकार वाहन चालक, मोटार चालविताना आसन पट्ट्याचा वापर करण्यास टाळणे, दुचाकीवर विना शिरस्त्राण वाहन चालविणे अशा विविध नियमांच्या उल्लंघना प्रकरणी महामार्ग पोलिसांकडून कारवाई होत असते. महामार्ग पोलिसांनी १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत १३ कोटी ७४ लाख ६२ हजार रुपयांची दंडाची कारवाई केली आहे.
ठाणे महामार्ग पोलिसांच्या हद्दीत चिंचोटी, मनोर, चारोटी, शहापूर आणि मालशेज हे क्षेत्र येतात. या क्षेत्रात महामार्ग पोलिसांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत १० कोटी ३२ लाख ८४ हजार रुपयांचा दंड आकारला. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ३ कोटी ४१ लाख ७८ हजार २०० रुपये इतका दंड आकारण्यात आला. २०२४ या संपूर्ण वर्षात पोलिसांनी ७६ हजार ७३७ इतक्या कारवाया केल्या. तर या वर्षी ३१ मार्च पर्यंत २२ हजार ४१४ इतक्या कारवाया झाल्या आहेत.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४
क्षेत्र – दंड आकारणी (रुपयांत)
चिंचोटी – ४,४१,१,६००
मनोर- १,४६,९४,२००
चारोटी- २,५४,५३,९००
माळशेज – २,३५,१८,१००
शहापूर – ३,५२,०६,२००
एकूण – १०,३२,८४,०००
महामार्ग पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यानुसार पथकांनी या कारवाया केल्या आहेत. – रुपाली अंबुरे, अधीक्षक, ठाणे महामार्ग पोलीस.