ठाणे – शहरातील लोकमान्यनगर टिएमटी बस आगारा समोरील रस्ता कॉंक्रीट करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे नागरिकांमधून आता संताप व्यक्त होऊ लागला आहे. या कामामुळे य़शोधन नगर, सावरकर नगरच्या नागरिकांना पायपीट करत बस पकडण्यासाठी लोकमान्यनगर आगारात यावे लागत आहे. सायंकाळच्यावेळी देखील त्यांना लोकमान्य आगारात उतरुन यशोधन नगर आणि सावरकर नगरला जावे लागत आहे. यात,नागरिकांचा अधिक वेळ खर्चिक होत असून त्यांच्यामधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
ठाणे येथील लोकमान्यनगर भागात टिएमटीचा आगार आहे. या आगारासमोरील रस्त्यावरून टिएमटी तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. हा रस्ता डांबरी होता. या डांबरी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम काही महिन्यांपासून महापालिकेने हाती घेतले होते. पावसाळ्यापुर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत हे काम पुर्ण करण्याचे पालिकेने ठरविले होते. त्यानुसार, या रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात आले. रस्त्याखालील मलवाहिन्या आणि चेंबर उभारणीचे कामामुळे रस्त्याचे काम सुरु होण्यास विलंब झाला.
या कामामुळे रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक आगारातून वळविण्यात आली आहे. परंतू, आता चार महिने उलटून गेले तरी, अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे याभागातील नागरिकांकडून ठाणे महापालिकेच्या या कामावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
या कामामुळे य़शोधन नगरहून लोकमान्यनगरकडे जाणारा रस्ता यशोधन बस थांब्याजवळ बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरुन केवळ इतर खासगी वाहतूक सुरु आहे. टीएमटी बसगाड्यांसाठी अद्याप हा रस्ता खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकमान्यनगर आगारातून टीएमटी बस गाड्या इंदिरानगर मार्गे सोडल्या जात आहेत. परंतू, यशोधन नगर, सावरकर नगर भागात टीएमटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना गेले दीड महिन्यांपासून बस पकडण्यासाठी पायपीट करत लोकमान्यनगर आगार गाठावे लागत आहे. यामध्ये त्यांचा अधिकचा वेळ खर्चिक होत आहे.
सायंकाळच्या वेळीदेखील लोकमान्यनगर आगारात उतरुन त्यांना पायी चालत यशोधन नगर आणि सावरकरनगरला जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून हा रस्ता कधी सुरु करणार असा प्रश्न आता त्यांच्याकडून विचारला जाऊ लागला आहे.
प्रतिक्रिया…
मला दररोज महाविद्यालयात जाण्यासाठी बस पकडण्याकरिता यशोधननगर हून पायी चालत लोकमान्यनगरला जावे लागते. अनेकदा घरुन निघायला उशिर होतो. त्यात, बससाठी लोकमान्य नगर जायला आणखी वेळ लागतो. त्यामुळे महाविद्यालयात पोहोचण्यास देखील विलंब होतो. – आर्या पांचाळ, नागरिक.