कल्याण – गेल्या दोन दिवसापूर्वी कल्याण शहराच्या विविध भागात भटक्या श्वानांनी एकाच दिवशी ६७ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते. हे रुग्ण नागरिक कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर श्वानाने केलेल्या जखमेप्रमाणे उपचार करण्यात आले. कमी जखम असलेल्या रुग्णांना ॲन्टी रेबीज आणि मोठी जखम असलेल्या रुग्णांना ॲन्टी रेबीज इंजेक्शनबरोबर इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आले, अशी माहिती पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांनी दिली.

बहुतांशी रुग्णांना पायाच्या वरील भागात नडग्यांजवळ श्वान चावला होता. श्वानाने दंश केल्यानंतर ती कोणत्या ग्रेडची जखम आहे. त्याप्रमाणे रुग्णांना ॲन्टी रेबीज, इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन दिली जातात. ग्रेड तीनची जखम मोठी मानली जाते. ६७ श्वान दंश झालेल्या रुग्णांमध्ये पाच ते सहा जणांना मोठ्या जखमा होत्या. त्या जखमा स्वच्छ करून आवश्यक उपचार करून त्यांना पहिले ॲन्टी रेबीज आणि त्यानंतर जखम मोठी असल्याने इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शने देण्यात आली. या रुग्णांवर इंजेक्शन दिल्यानंंतर अर्धा ते एक तास डाॅक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना कोणताही त्रास न जाणवल्याने त्यांना रात्रीच घरी सोडण्यात आले, अशी माहिती डाॅ. दीपा शुक्ल यांनी दिली.

दोन दिवसापूर्वी कल्याण शहराच्या गोविंदवाडी, कोळीवाडा, वल्लीपीर रस्ता आणि इतर भागात भटक्या श्वानांनी एका वेळी ६७ जणांना चावा घेतला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. श्वान दंश झालेले रुग्ण उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या पायांना चावण्याच्या झालेल्या जखमा पाहून त्यांच्यावर डाॅक्टरांनी उपचार केले. गोविंदवाडी भागातील श्वान चावल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. एक नागरिक आपल्या इमारतीमधून उतरून दुचाकी काढून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात नेहमी इमारत परिसरात फिरणारे भटके श्वान या नागरिकाच्या दिशेने येऊन त्यांच्या पायांना चावे घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने परिसरातील नागरिक भयभीत झाले.

गोविंदवाडी, कोळीवाडा, वल्लीपीर रस्ता भागात शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे आहेत. शाळेमध्ये पालक, विद्यार्थी यांची वर्दळ असते. या घटनांनी पालक, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडून त्यांच्या नसबंदी आणि निर्बिजीकरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दर महिन्याला सुमारे एक हजाराहून अधिक लोकांना भटके श्वान दंश करतात. तसेच, पालिकेने आणखी एक निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती डाॅ. दीपा शुक्ल यांनी दिली.