Thane Rain News : सलग तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा धसका नागरिकांनी घेतल्याने आज, ठाणे रेल्वे स्थानक, रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. काल रेल्वे रुळांवरून झालेली पायपीट, वाहतुक कोंडी यामुळे अनेक नोकरदारांनी आज घरुनच काम करण्याचा निर्णय घेतला किंवा सुट्टी घेतली. त्यामुळे मागील दोन दिवसांपेक्षा आज ठाण्यात वेगळे चित्र होते.
सलग तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. रस्ते पाण्याखाली जाणे, रेल्वे रुळांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यानंतर अखेर बुधवारी ठाण्यात चित्र बदललेले दिसले. मंगळवारी अनेक नोकरदारांनी मुलुंड, भांडूप येथून पायपीट करत रेल्वे रुळांवरून चालत ठाणे रेल्वे स्थानक गाठले होते. ठाण्यात पोहचल्यानंतर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात होती.
अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. या अनुभवामुळे बुधवारी अनेक नोकरदारांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडला, तर काहींनी थेट सुट्टी काढणेच पसंत केले. परिणामी, बुधवारी सकाळपासूनच ठाणे रेल्वे स्थानकावर नेहमीसारखी गर्दी नव्हती. परंतु रेल्वे वाहतुक १० ते १५ मिनीटे उशीराने सुरु होती. रस्त्यांवरील वाहतूक देखील तुलनेने सुरळीत होती.
पाऊस सुरूच
मंगळवार प्रमाणे बुधवारी देखील पाऊस सुरुच असल्याचे चित्र होते. त्यामुळे नदी, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मागील तीन दिवसांत सखल भागात पाणी साचल्याने अनेकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये पाणी साचले होते. हे पाणी ओसरत नसून बुधवारी देखील पाऊस पडल्याने करायचे काय असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.