ठाणे : गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणूका खड्ड्यातून निघाल्यानंतर विसर्जन मिरवणूका देखील खड्ड्यातूनच काढाव्या लागल्या. शहरातील मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोडबंदर, कळवा-विटावा, भिवंडी येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी रस्ते असमान झाले आहेत. त्यामुळे नोकरदारांपाठोपाठ गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणूकींनाही खड्ड्यांचा फटका बसला. दुसरीकडे श्रमवीजी संघटनेने भिवंडी-वाडा मार्गाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे आता खड्ड्यांचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही महिन्यांपासून मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दररोज नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना सहन करावा लागत असून नागरिक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भिवंडीत दोघांना खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला होता. नोकरदार, प्रवाशांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. शाळेतील विद्यार्थ्यांनाही तासन-तास कोंडीत अडकावे लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजविले जातील अशी आशा नागरिकांना होती. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पूर्णत: खड्डे भरणी झाली नसल्याचे दिसून येते.
भिवंडी शहरात गणेशोत्सवा निमित्ताने आगमन मिरवणूका निघाल्या होत्या. या मिरवणूकांना खड्ड्यांचा फटका बसला होता. खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिकांकडून प्रशासनाविरोधात टीका केली जात आहे. गुरुवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. परंतु या विसर्जन मिरवणूकाही खड्ड्यांतून काढण्याची वेळ नागरिकांवर आली. ठाणे, भिवंडीत खड्डे पडल्याने नागरिकांची कोंडीतून केव्हा सुटका होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्याने तसेच असमान झाल्याने अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे.
भिवंडी – वाडा रस्तावर पडलेले खड्डे, खड्ड्यांमुळे किती अपघात झाले?
रस्त्यावर २०१२ पासून आतापर्यंत किती खर्च करण्यात आला? इतके करून देखील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत केली. तसेच ज्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्याच कंपनीला स्त्याचे काम का देण्यात येत, असा सवाल देखील बैठकीत संघटनेने उपस्थित केला.