ठाणे : ठाण्यात सण-उत्सवांच्या कालावधीत बेकायदा फलकबाजी करणे नित्याचे झाले. परंतु आता सण-उत्सव साजरा झाल्यानंतरही हे बेकायदा फलक रस्त्यावरील चौकात, पदपथालगत कायम आहेत. नवरात्रौत्सावतही अशीच परिस्थिती होती. बहुतांश फलक हे राजकीय पक्षाशी संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बेकायदा फलकबाजीतून महापालिकेद्वारे सूट मिळते का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

ठाणे शहरात गेल्याकाही वर्षामध्ये मोठ्याप्रमाणात बेकायदा फलक उभारले जात आहेत. यामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा सामावेश अधिक असतो. दिवाळी निमित्ताने अनेक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाणेकरांना दिवाळी निमित्ताने शुभेच्छांचे बेकायदा फलक चौका-चौकात, पदपथालगत उभारले आहेत. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने या फलकांमध्ये पूर्वीच्या तुलनेत आणखी वाढ झाली आहे.

दिवाळीनंतर हे फलक काढणे अपेक्षित होते. अद्यापही महापालिकेने या फलकांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ठाणे, माजिवडा, घोडबंदर, वागळे इस्टेट, वर्तकनगर भागात मोठ्याप्रमाणात फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या फलकांमुळे शहर देखील बकालावस्थेत दिसत आहे. या फलकांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.