Thane Commuters Struggle : ठाणे – नवरात्रोत्सव म्हटलं की ठिकठिकाणी देवींची सजलेली मंडपं, रोषणाई आणि भक्तांची गर्दी… पण या उत्साहाला वाहतुकीच्या कोंडीने अडथळा आणला आहे. ठाणे शहरात नवरात्रीनिमित्त रस्ते बंद करून वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मात्र या बदललेल्या मार्गांवर वाहनांचा भार वाढला असून, दररोज सायंकाळी ठाणेकरांना वाहतुकीच्या कोंडीत तासन्तास अडकावे लागत आहे. १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दीड तास खर्च करावा लागत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. घोडबंदर आणि ठाणे मार्गावर मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. याशिवाय, घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा जोडणीचे काम सुरू आहे. आनंदनगर भागात त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे तर, मानपाडा येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी रस्ता अरुंद झाले आहेत. त्यात नवरात्रीमुळे ठाणे स्थानक ते घोडबंदर, भिवंडी या ठिकाणी जाण्यासाठीचे अंतर्गत मार्ग बंद करून वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पर्यायी मार्गांवर दररोज सायंकाळनंतर वाहनांचा भार वाढत आहे. यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाणे सॅटीस पुलावर दररोज सायंकाळनंतर परिस्थिती गंभीर होत आहे.
ठाणे महापालिका परिवहनच्या (TMT) बसगाड्या या वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे सॅटीस पुलावर या गाड्या पोहचण्यासाठी उशीर होतो. परिणामी सायंकाळी बसगाड्या उशिरा आल्याने थांब्यांवर प्रवाशांच्या रांगा वाढवून प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे थांब्यावर उशिरा आलेल्या बसमध्ये प्रवाशांची झुंबड उडते. या वाहतूक कोंडीत रिक्षा, खासगी गाड्याही अडकलेल्या असतात. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या ठाणेकरांसाठी “संध्याकाळचा प्रवास म्हणजे एकप्रकारे परीक्षा” ठरत आहे. दररोज सायंकाळी ठाणेकरांना वाहतुकीच्या कोंडीत तासन्तास अडकावे लागत आहे. १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दीड तास खर्च करावा लागत आहे.
या मार्गांवर असते कोंडी
गोखले रोड, नौपाडा, चरई, तलावपाळी, खोपट, वंदना, कोर्ट नाका, पाचपाखाडी, नितीन कंपनी, कॅटबरी, माजिवडा, रुस्तमजी, कळवा, खारेगाव , घोडबंदर
“कामावरून थकून घरी जातो, पण घरी पोहोचायचं तर वाहतुकीच्या गोंधळात अडकल्याशिवाय पर्याय नाही. उत्सव आहे ठीक आहे , पण आमच्यासाठी रोजचं संकट झालंय,” असा संताप एका प्रवाशाने व्यक्त केला.