ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यातील ठाणे महापालिका क्षेत्रात दोन दिवस २० टक्के पाणी कपातीमुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागला. अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाहून आलेला कचरा पाणी उपसा केंद्रातील पंपाच्या मुखाशी अडकल्याने ही कपात झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्ष लीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.
ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे.
ठाणे पालिकेच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यासाठी हा स्त्रोत महत्वाचा मानला जातो. महापालिका स्वत:च्या पाणी योजनेसाठी भातसा नदीच्या पात्रावरील पिसे पाणी उपसा केंद्र येथून पाणी उचलते. परंतु गेले दोन दिवस नदी पात्रातून पाण्याचा पुरेसा उपसा करणे पालिकेला शक्य होत नव्हते. यामुळेच रविवार आणि सोमवार यादिवशी महापालिकेच्या योजनेतून शहराला २० टक्के कमी पाणी मिळाले. या वृत्तास ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दुजोरा देत मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.
ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण का झाली
गेले काही दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पाणी उपसा केंद्र (पंपिंग स्टेशन) येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसापासून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होत नाही. तसेच, गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. या पंपाच्या मुखाशी अडकलेला गाळ काढण्याचे काम पालिकेने रविवारी केले. या कामानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे सोमवारीही शहरात टंचाईची समस्या निर्माण झाली.