ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई ठाणे महापालिका प्रशासनाने हाती घेतली असून त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करण्याची विशेष मोहीमही राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत २९५ इमारतींच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, बोअरवेल बंद करण्याबरोबरच मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवाशी वास्तव्यास येतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते. या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यानुसार, पाणी पुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी २५ जुलैपासून विशेष मोहिम हाती घेतली आहे.
शहराभर कारवाई
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम २५ जुलैपासून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत दिवा, मुंब्रा, माजिवडा-मानपाडा, कळवा, उथळसर, लोकमान्य नगर-सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात येत आहे. ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून बोअरवेलही बंद करण्यात आल्या आहेत.
२९५ नळजोडण्या खंडीत
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २५ जून ते आतापर्यंत राबविलेल्या मोहिमेत २९५ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. यासोबतच ९६ बोअरवेल्स आणि ४५ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व कुपनलिकांवर कारवाई करून त्या तोडण्यात आल्या असून, जलशुद्धीकरण यंत्रणाही हटवण्यात आली आहे. या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे. यामुळे अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत.