Thane illegal construction : ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात ९०९ बेकायदा बांधकामे आढळून आली असून त्यापैकी २२७ बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याने पालिकेची कारवाई काहीशी थंडवली होती. मात्र, गणेशोत्सव संपताच ठाणे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ते कायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून सोमवारी केलेल्या कारवाईत पालिकेने दिव्यामध्ये सदगुरू नगर आणि शीळ रोडवरील ५ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्या.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून यात बेकायदा बांधकामे तोडण्यात येत आहेत. याशिवाय, ठाणे महापालिकेकडूनही शहरातील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या बेकायदा बांधकामांच्या माहितीचा अहवाल नुकताच उच्च न्यायालयात सादर झाला आहे. या अहवालानुसार, ठाण्यात ९०९ बेकायदा बांधकामे असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात, सर्वाधिक ७४० बेकायदा बांधकामे ही दिवा, शीळ आणि मुंब्रा पट्टयातील आहेत.

गणेशोत्सवानंतर कारवाई सुरू

बेकायदा बांधकामे पाडताना नागरिकांचा विरोध होतो. काही वेळेस पथकावर हल्लेही होतात. यामुळे अशा बांधकामांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येते. परंतु गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये पोलिस यंत्रणा व्यस्त होती. त्यामुळे या काळात बेकायदा बांधकामांच्या कारवाईसाठी बंदोबस्त देणे पोलिस यंत्रणेला शक्य होत नाही.

सण-उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. या काळात पोलिसांना अधिक सर्तक रहावे लागते. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. यानुसार, मात्र, गणेशोत्सव संपताच ठाणे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरु केली आहे.

या कारवाईवेळी उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त सचिन सांगळे, सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड उपस्थित होते. अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती येथील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

पाच इमारतींवर कारवाई

पोलिस बंदोबस्ताविना कारवाई करणे शक्य नसल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पालिकेने बेकायदा बांधकामांचा वीज, पाणी पुरवठा तोडण्याची कारवाई केली. तर, गणेशोत्सव संपताच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे पालिका प्रशासनाने सोमवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील बी. आर. नगर येथील दोन इमारती, सदगुरू नगर मधील २ इमारती आणि दिवा-शीळ रोड येथील १ इमारत अशा एकूण पाच इमारतींवर पोकलेन मशीनचे सहाय्याने कारवाई केली. या पाचही इमारती तळ अधिक एक मजल्याच्या होत्या. या अर्धव्याप्त, व्यावसायिक व निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे, महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे.