ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघातील कोपरी परिसरात शनिवारी ठाणे काँग्रेसने खड्डे भरो आंदोलन केले. या भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात आले नाही, तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत असलेल्या महामार्ग आणि रस्त्यांवर खड्डे पडले असून या खड्डे प्रवासामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच ठाणे महापालिका क्षेत्रातील काही अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. यावरूनच ठाणे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून ते आता रस्त्यावर उतरू लागले आहेत.

ठाणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे, वाढते अपघात यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे, असा आरोप करत शनिवारी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील कोपरी परिसरात खड्डे भरो आंदोलन केले.

कोपरी येथील मो. कृ. नाखवा हायस्कूल परिसरात काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष निलेश आहिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, प्रभाग आणि वार्ड अध्यक्ष, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलकांनी रस्त्यावरील खड्डे स्वतः भरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपयशावर काँग्रेसने रोष व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्याच्या रस्त्यांवर प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे. हे केवळ नागरी सुविधांचे अपयश नाही, तर जनतेच्या सुरक्षेचा घात आहे. लाखो कोटींचा निधी असूनही रस्त्यांची ही अवस्था म्हणजे कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि ठेकेदारी यंत्रणेचा भ्रष्ट चेहरा आहे. आता खड्डे भरून प्रशासनाला जाग करणे गरजेचे झाले आहे, असे ब्लॉक अध्यक्ष निलेश आहिरे यांनी सांगितले. लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात आले नाही, तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.