Narendra modi ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर गुरुवारी काँग्रेसतर्फे निवडणूक आयोग आणि भाजप सरकारविरोधात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोहिमेदरम्यान एका महिलेनं संताप व्यक्त करत काँग्रेस(congress)कार्यकर्त्यांना थेट जाब विचारल्याने ठिकाणी एकच खळबळ उडाली. महिलेने थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं, “काँग्रेस हा बूथ चोरणारा पक्ष आहे. नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा त्यांना अधिकार नाही.”
देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरी आणि गैरव्यवहाराच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाद्वारे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजप सरकारवर संगनमताचे आरोप पुन्हा एकदा जोरात करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत एका महिलेचा वाद झाला. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले.
नेमके काय घडले
काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांकडून सह्या घेत असताना तेथून जाणाऱ्या एका महिलेने संताप व्यक्त केला. “बळजबरीने सह्या का घेताय?” या प्रश्न उपस्थित केल्याने वातावरण तापले. कार्यकर्त्यांनी महिलेला गप्प करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती अधिकच संतापली. महिलेने थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं, “काँग्रेस हा बूथ चोरणारा पक्ष आहे. नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा त्यांना अधिकार नाही.” या वक्तव्यानंतर ठिकाणी उपस्थित नागरिकांमध्येही चर्चा रंगली. काहींनी महिलेच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले, तर काहींनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बाजू घेत वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
मोदीजी को चोर क्यू बोलते हो
“मोदीजी को चोर क्यू बोलते हो, क्या चोरी की है उन्होने?” असा प्रश्न उपस्थित करत महिलेने काँग्रेस कार्यकर्त्यांना सुनावले. दरम्यान, या महिलेनं ठाकरे गट आणि मनसेवरही निशाणा साधत म्हटलं, “शिवसेना ठाकरे गटानं मुंबई महापालिका लुटली. येत्या काळात ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष शून्य होतील.” या घटनेमुळे काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला अनपेक्षित वळण मिळालं असून, ठाण्यात राजकीय चर्चेला चांगलंच ताप आलं आहे.
