ठाणे – ठाणे पश्चिमेतील बाळकूम येथील सौरभ आणि जान्हवी भदे या दाम्पत्याने यंदाच्या गणेशोत्सवात एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवला आहे. आपल्या घरी ‘मोरया धान्य भांडार’ या नावाने गणपतीची सजावट करून त्यांनी किराणा दुकानाचा देखावा उभा केला आहे. दुकानासारखी सजावट करून त्यात सर्व प्रकारचे धान्य व किराणा सामान ठेवण्यात आले आहे.
तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या नातेवाईक व पाहुण्यांना मिठाई, पेढे किंवा फळं आणण्याऐवजी धान्य आणण्याचे आवाहन भदे कुटुंबीयांनी केले आहे. हे सर्व धान्य थेट ‘धान्य बँक’ या सामाजिक उपक्रमासाठी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या अनोख्या कल्पनेला गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दर्शनाला येणारे सर्वजण आनंदाने धान्य गोळा करत आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक नागरिक आपल्या घरच्या गणपतीला विविध धार्मिक, सामाजिक विषयांना अनुसरून देखावे उभारत असतात. यंदाही ठाण्यातील अनेक कुटुंबांनी सामाजिक संदेश देणारे देखावे उभारले आहे. याच पार्श्वभूमीवर बाळकूम येथील सौरभ आणि जान्हवी भदे या दाम्पत्याने यंदाच्या गणेशोत्सवात एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवला आहे. घरी ‘मोरया धान्य भांडार’ या नावाने गणपतीची सजावट करून त्यांनी किराणा दुकानाचा देखावा उभा केला आहे. दुकानासारखी सजावट करून त्यात सर्व प्रकारचे धान्य व किराणा सामान ठेवण्यात आले आहे.
तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी दर्शनासाठी येणाऱ्या नातेवाईक व पाहुण्यांना मिठाई, पेढे किंवा फळं आणण्याऐवजी धान्य आणण्याचे आवाहन भदे कुटुंबीयांनी केले आहे. तर या उपक्रमातून गोळा करण्यात आलेले सर्व धान्य थेट ‘धान्य बँक’ या सामाजिक उपक्रमासाठी देण्यात येणार आहे.
‘वुई टुगेदर फाउंडेशन’ तर्फे २०१५ पासून सुरू असलेल्या धान्य बँक उपक्रमाद्वारे गरीब, गरजू व उपेक्षित घटकांना जीवनावश्यक धान्य पुरवले जाते. समाजातील दुर्बल घटकांसाठी धान्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानात यंदा भदे कुटुंबीयांनी सहभाग घेतला असून, त्यातून सण-उत्सव हा केवळ उत्साहाचा भाग नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचे माध्यम आहे, हा संदेश त्यांनी अधोरेखित झाला आहे. आजच्या काळात गणेशोत्सवाची सजावट ही अनेकदा केवळ दिखाव्यासाठी केली जाते. मात्र भदे कुटुंबीयांनी सर्जनशीलतेसोबत सामाजिक भानही जपले आहे. गणपतीसारख्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड भदे कुटुंबीयांनी दिली आहे.
