ठाणे : बदलापूरातील इमारतीच्या चौथ्या- पाचव्या मजल्यावरील बंद घरांमध्ये शिरून घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. रोशन जाधव (३४) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जुलैला घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा उल्हासनगर युनीटकडून सुरू होता. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, यातील आरोपी रोशन जाधव अमरडाय कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोशन याला ताब्यात घेऊन अटक केली. तो डोंबिवलीतील निळजे भागातील रहिवासी असून पोलिसांनी त्याच्याकडून १८९.१७ ग्रॅम वजनाचे १५ लाख १३ हजार ३६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ८० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटाॅप, ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, गुन्ह्यात चोरी केलेल्या रोकडपैकी ३ लाख २८ हजार रुपये असा एकूण १९ लाख ८१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पोलीस नाईक कुसूम शिंदे, विक्रम जाधव, पोलीस शिपाई संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले यांनी केली.
चौकट
रोशन जाधव हा पदवीधर असून त्याने बीएमएम पदवीचे शिक्षण घेतले आहे. तो चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील बंद घरामध्ये घरफोडी करत असे. सुरुवातीला काही दिवस रेकी केल्यानंतर एखादे घर बंद असल्यास भर दिवसा तो घरामध्ये शिरत होता. इमारतीतील पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर घरफोडी केल्यास पकडले जाण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे तो चौथ्या किंवा पाचव्या मजल्यावर ही घरफोडी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोशन जाधव हा भरदिवसा घरफोडी करत असे. त्याच्या अटकेमुळे बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम, शिवाजीनगर या पोलीस ठाण्यात दाखल असलेले आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. – अमरसिंह जाधव, उपायुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा.