Thane Dahi Handi 2025 Celebration : ठाणे : जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांचा विक्रम केल्याची घटना ताजी असतानाच, देशात प्रसिद्ध असलेल्या जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाने तीन ठिकाणी १० थरांचे मानवी मनोरे रचत विक्रमाशी बरोबरी केली. जय जवान पथकाने मुंबईत एका ठिकाणी, ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या हंडीत आणि अविनाश जाधव यांच्या हंडीत १० थरांचे मानवी मनोरे रचत विक्रम रचला.

मुंबई किबहुना देशातील प्रसिद्ध गोविंदा पथकांपैकी एक असलेले जय जवान गोविंदा पथक हे ९ थर लावण्यास प्रसिद्ध आहेत. शनिवारी कोकण नगर गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये १० थर रचले होते. या गोविंदा पथकाने १० थर रचून विश्व विक्रम केला होता. परंतु मागील काही महिन्यांपासून जय जवान गोविंदा पथकही १० थरांसाठी सराव करत होते. त्यांनी मुंबई येथे एका ठिकाणी १० थर रचले. त्यानंतर ते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने १० थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावतीने देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी देखील जय जवान गोविंदा पथक दाखल झाले. तिथेही त्यांनी १० थर रचून वेगळा विक्रम केला. जय जवान गोविंदा पथक मनोरा रचताना सर्वत्र शांतता पसरली होती. जय जवान गोविंदा पथकाने विक्रमाची बरोबरी केल्याने पुढील वर्षी किती थर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.