Thane Dahi Handi 2025 Celebration Jitendra Awhad : ठाणे : ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दही हंडीमध्ये राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना (ठाकरे गट) माजी खासदार राजन विचारे यांनी भेट दिली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘जय-जय महाराष्ट्र माझा’ गीत गात गोविंदा पथकांचा विश्वास वाढविला. जितेंद्र आव्हाड हा दहीहंडी उत्सव आयोजित करत त्यावेळी हे गाणे गात असे. त्यामुळे पुन्हा एकदा गाणे गायल्याने गोविंदा पथकांच्या आणि आव्हाड यांच्या आठवणी जाग्या झाल्या. मनसेच्या हंडीत आव्हाड, विचारे गेल्याने ठाण्यात मनसे, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे तिघेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकत्र दिसतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हटले जात असले तरी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची दहीहंडी आजही ठाणेकरांना आठविते. त्यांनी मागील १० वर्षांपासून दहीहंडी बंद केली आहे. ठाण्यातील पाचपाखाडी येथील ओपन हाऊस या ठिकाणी संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आव्हाड हे दहीहंडीचे आयोजन करत होते. त्यांच्या दहीहंडीत ‘जय-जय महाराष्ट्र माझा’ गायले जात असे. हे गाणे गाताना अंगावर शहारा येत असे असे गोविंदा पथके सांगतात.
दहीहंडी निमित्ताने सकाळीच आव्हाड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये ‘दहीहंडी उत्सव आठवण’ असे लिहीले आहे. त्यांच्या हंडीचा व्हिडीओ दाखविले आहे. त्यामध्ये आव्हाड हे अँकरिंग करताना, गोविंदांसोबत नाचताना पाहायला मिळतात. यानंतर आव्हाड यांनी त्यांच्या पोस्ट खाली हॅश टँग करत ‘मिस यु सो मच’,‘गोविंद’, ‘दहीहंडी’, ‘संघर्ष दहीहंडी’ असे म्हटले आहे. आव्हाड यांच्या पोस्टला अनेकांच्या कॉमेंटही मिळत होत्या.
ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्यावतीने देखील ठाण्यातील चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु आव्हाड आणि विचारे या दोघांनीही मनसेच्या हंडीला भेट देली. आव्हाड यांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी जय-जय महाराष्ट्र गीत गायले. यावेळी गोविंदा पथकांनी त्यांना दाद देण्यासाठी हात उंचावले होते.
ठाण्यात राजकीय समीकरणे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. दुसरीकडे शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाल्याने राष्ट्रवादीमध्येही फूट पडली. मनसेच्या हंडीत आव्हाड, विचारे गेल्याने ठाण्यात मनसे, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे तिघेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.