Thane News, dahi handi 2025 ठाणे – ठाणे शहरात दहीहंडी उत्सवात १७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोविंदा जखमींची संख्या ९ इतकीचं होती. परंतू, सायंकाळी ४ वाजताच्या नंतर या संख्येत वाढ झाली असून आता एकूण १७ गोविंदा जखमी झाले आहेत.

ठाणे शहरात सकाळ पासून ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी दाखल झाले आहेत. विविध दहीहंडी आयोजकांकडे या पथकांनी थर रचले. त्यातील काहीजणाचे थर अचूक लागले तर, काहींचे कोसळले. पण,या चुरशीमध्ये १७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडींचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडींना लाखो रुपयांचे पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. या दहीहंडीमध्ये थर रचण्यासाठी सकाळपासून ठाण्यासह मुंबई आणि उपनगरातील गोविंदा पथक दाखल झाले आहेत. सकाळ पासून हे गोविंदा उंच उंच थर रचण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, काही ठिकाणी गोविंदा थर रचताना कोसळून जखमी झाले आहेत.

सायंकाळी ४ वाजेपर्यंत कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ०३ गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. आता यामध्ये नऊ रुग्णांची आणखी वाढ झाली असून कळवा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या जखमींची संख्या १२ इतकी झाली आहे. यातील काही रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले होते. तर, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण ०५ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.